Case registered Pudhari File Photo
वर्धा

Wardha crime : धान्य घोटाळा प्रकरण! निलंबित निरीक्षण अधिकाऱ्यासह सेल्समनवर गुन्हा दाखल 

शासन परिपत्रकाचे पालन न करता शिधापत्रिका हेतुपरस्पर वळती केल्याचे चौकशीत उघडकीस आले

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : वर्ध्याच्या तहसील कार्यालयांतर्गत धान्य पुरवठा विभागामध्ये ३१ लाख ७७ हजारांचा धान्य घोटाळा उघडकीस आला. या प्रकरणी निलंबित पुरवठा निरीक्षण अधिकार्‍यासोबतच सेल्समनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी यांनी याबाबत वर्धा शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून निलंबित तालुका निरीक्षण अधिकारी मनीषा माजरखेडे, सेल्समन योगेश भोले याच्याविरोधात वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तहसीलदारांनी केलेल्या चौकशीत विविध बाबी उघडकीस आल्या होत्या.

निरीक्षण अधिकारी मनिषा माजरखेडे यांनी शासन परिपत्रकामधील निर्देशाचे पालन न करता आरसीएमएस प्रणालीमधील लॉगीन आयडीमधून लाभार्थ्यांच्या चार महिन्यात ६१९ शिधापत्रिका हेतूपरस्पर एकाच स्वस्त धान्य दुकानात वळती केल्याचे चौकशीत उघडकीस आले. यामुळे आरसी वळती केलेल्या कार्डधारकांना प्राधान्य गटाचे गहु, तांदुळ नियमबाहय वाटप केल्याचे स्पष्ट झाले. निरीक्षण अधिकारी मनिषा माजरखेडे यांनी शासनाच्या निर्णयाचे पालन न करता अतिरीक्त धान्य मंजुर करून शासनाचे ३१ लाख ७७ हजार ७९१ रुपयाचे आर्थिक नुकसान झाल्याचे चौकशीत उघडकीस आले.

निरीक्षण अधिकारी मनिषा माजरखेडे यांनी शासनाने दिलेल्या अधिकाराचा स्वत:चा फायदा करून घेण्यासाठी विशिष्ट संबंधित रास्तभाव दुकानदाराला अनुदेय धान्यापेक्षा अतिरीक्त धान्य मंजूर करून दुकानदाराशी संगनमत करून धान्याचा अपहार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. निरीक्षण अधिकार्‍यांनी सायलेंट आरसी एकाच दुकानात वळती केल्याचे पुढे आले. तसेच सायलेंट आरसीवर धान्य उचल झाल्याने शासनाचे आर्थिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. शासन परिपत्रकाचे पालन न करता शिधापत्रिका हेतुपरस्पर वळती केल्याचे चौकशीत उघडकीस आले.

पूर्वपरवानगी न घेता स्वत:च्या स्तरावर पॉस मशीन वर नॉमिनी व कमीशन अदा करण्यासाठी परस्पर नेमणूक केल्याचे स्पष्ट झाले. निलंबीत निरीक्षण अधिकरी मनिषा माजरखेडे यांनी स्वस्तधान्य दुकानात नियमबाहय विक्री प्रतिनिधी योगेश भाले याची नियुक्ती करुन व संगनमत करुन स्वस्तधान्य दुकानदारास अंधारात ठेवुन पदाचा गैरवापर करुन स्वस्तधान्य दुकानामध्ये बनावट कागदपत्रे तयार करुन सायलेंट आरसी वळती केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

जानेवारी २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीमध्ये गहू १४१.२० क्विंटल, तांदुळ ५५५.०७ क्विंटल व ज्वारी ४६.५६ क्विंटल अतिरिक्त धान्य मंजूर करुन अपहार केला. यामध्ये शासनाचे ३१ लाख ७७ हजार ७९१ रुपयाचे शासनाचे आर्थिक नुकसान केल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी तक्रारीवरून निरीक्षण अधिकारी मनिषा माजरखेडे, सेल्समन योगेश भाले याच्याविरोधात  विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान लाखो रुपयांच्या धान्य गैरव्यवहार प्रकरणी प्रशासकीय चौकशीनंतर निरीक्षण अधिकारी मनीषा मांजरखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT