Wardha Crime : वर्ध्यात पोलिसांची मोठी कारवाई; १२ लाखांचा सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त, एकास अटक

Wardha Crime
Published on
Updated on

वर्धा : राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू आणि गुटख्याच्या विरोधात वर्धा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरात अवैधरीत्या साठवून ठेवलेला तब्बल १२ लाख २९ हजार ८७२ रुपयांचा सुगंधित तंबाखू, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

तीन गोदामांवर पोलिसांचा छापा

पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार वर्धा शहरात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईची मोहीम सुरू आहे. यादरम्यान, भामटीपुरा येथील 'ताज किराणा' दुकानाचा मालक शेख इम्रान शेख सुलतान ऊर्फ सोनू सुपारीवाला हा मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित साठा करून असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या गोदामांवर छापे टाकले. या छाप्यात वेगवेगळ्या कंपन्यांचा सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि गुटखा असा एकूण १२ लाख २९ हजार ८७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासनाला पाचारण

हा साठा गुटखा आणि सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर विक्री करण्यासाठीच जमा करून ठेवल्याचे तपासात उघड झाले. कारवाई दरम्यान अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपी शेख इम्रान विरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस प्रशासनाची संयुक्त कामगिरी

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईच्या वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक विलास पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे, सहायक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड तसेच पोलीस अंमलदार गजेंद्र धर्मे, विवेक बन्सोड, प्रशांत वंजारी, नितीन इटकरे, नरेंद्र कांबळे, श्रावण पवार आणि अमोल ढोबाले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news