

वर्धा : वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'मकोका' (MCOCA) गुन्ह्यातील बऱ्याच दिवसांपासून फरार असलेल्या एका कुख्यात गुंडाला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. मंगेश चिंतामण मडावी (वय ३६, रा. इतवारा बाजार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी इतवारा बाजार येथील फिर्यादी हे अमोल गेडाम याला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अमोल गेडाम आणि मंगेश मडावी या दोघांनी फिर्यादीशी वाद घातला. या वादादरम्यान आरोपी अमोल गेडामने फिर्यादीच्या पोटावर चाकूने वार केला. फिर्यादीने तो वार अडवल्यामुळे चाकू त्यांच्या पोटाला चाटून गेला. तर दुसरा आरोपी मंगेश मडावी याने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे दोन्ही आरोपी कुख्यात गुंड असून, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून लोकांना धमकावणे आणि गुन्हेगारी कृत्य करत होते. त्यांच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांनी त्यांच्यावर 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९' (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक (नागपूर परीक्षेत्र) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.
हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर गुन्ह्यात 'मकोका'च्या कलम ३(१)(२), ३(२), ३(४) चा समावेश करण्यात आला. यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी अमोल गणेश गेडामे याला आधीच अटक केली होती. मात्र, त्याचा साथीदार मंगेश मडावी हा घटनेच्या तारखेपासून फरार होता.
फरार मंगेश मडावीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक कार्यरत होते. दरम्यान, आरोपी सुजातपूर परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुजातपूर येथे सापळा रचून मंगेश मडावीला ताब्यात घेतले आणि गुन्ह्यात अटक केली.
यांनी केली कारवाई: ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडू, पोलीस अंमलदार भूषण निघोट, धर्मेंद्र अकाली, अमोल नगराळे, मंगेश चावरे आणि अक्षय राऊत यांच्या पथकाने केली.