Wardha Crime : डिझेल, पेट्रोलची अवैध वाहतूक, पाच लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Wardha Crime : डिझेल, पेट्रोलची अवैध वाहतूक, पाच लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त
Published on
Updated on

वर्धा : जिल्ह्यात डिझेल आणि पेट्रोलची विनापरवाना अवैध वाहतूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. वर्धा ते सेवाग्राम रोडवरील महिलाश्रम परिसरात केलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी ५ लाख ७३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये एका पेट्रोलपंप मालकाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही व्यक्ती अवैधरित्या इंधनाची वाहतूक करून ते शहरातील एका पेट्रोलपंपावर विक्रीसाठी आणणार होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पथके तयार करून सेवाग्राम रोडवरील राजपाल पेट्रोलपंप परिसरात सापळा रचला. दरम्यान, एम.एच. ३२ ए.एस. ४८४३ क्रमांकाचे एक वाहन महिलाश्रम परिसराकडून पेट्रोलपंपाच्या दिशेने येताना दिसले. पोलिसांनी संशयावरून हे वाहन थांबवले आणि चालकाची चौकशी केली.

वाहनाची झडती घेतली असता पोलिसांना धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. वाहनामध्ये एकूण २० प्लास्टिकच्या डबक्यांमध्ये इंधनाचा साठा दडवून ठेवण्यात आला होता. यामध्ये २८० लिटर पेट्रोल (किंमत २९,१२० रुपये) आणि १२० लिटर डिझेल (किंमत १०,९२० रुपये) असा एकूण ४०,०४० रुपयांचा इंधन साठा आढळून आला. पोलिसांनी यासह वाहतुकीसाठी वापरलेले वाहन आणि मोबाईल असा एकूण ५ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी वाहन चालक समीर शकील शेख (वय २२, रा. सेलू) आणि रवींद्र विठ्ठलराव चोरे (वय ४५, रा. केळझर) यांना ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशी केली असता, हे आरोपी केळझर परिसरातील ढाब्यांवर थांबणाऱ्या टँकर चालकांकडून कमी भावात पेट्रोल-डिझेल खरेदी करत असत. हा साठा करून ते वर्ध्यातील राजपाल पेट्रोलपंपचे मालक गिरीश राजपाल (रा. मोहिनीनगर) यांना जास्त भावाने विकण्यासाठी आणत असल्याची कबुली त्यांनी दिली. हे आरोपी संगनमताने नियमितपणे अशा प्रकारे इंधनाची अवैध विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या गंभीर प्रकरणी वर्धा शहर पोलिस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलिस अधीक्षक सदाशीव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विनोद चौधरी, आशिषसिंह ठाकूर व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news