

Wardha Crime News : वर्धा जिल्ह्यातील रोठा गावात १२ वर्षीय मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तिघा संशयितांकडे चौकशी सुरू आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे. तब्बल १४ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत बालिका बुधवारी (१५ जुलै) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी आली होती. तिचे कुटुंब शेतमजुरी करून उदरनिर्वाह करते. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बालिकेची आई आणि मोठी बहीण शेतातील घरी परतल्या, तेव्हा त्यांना बालिकेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
प्राथमिक तपासानुसार, बालिकेची दगडाने ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. हत्येसाठी वापरलेला दगड पोलिसांनी जप्त केला आहे. मृतदेहाच्या स्थितीवरून बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय असून, पोलिसांनी त्यासंबंधीची कलमे गुन्ह्यात समाविष्ट केली आहेत. मात्र, अत्याचाराबाबतचा अंतिम निष्कर्ष उत्तरीय आणि न्यायवैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) स्तरावरील अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि इतर पोलीस ठाण्यांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची १४ विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.सायबर व इतर तांत्रिक तपासासाठी २ वेगळी विशेष पथके कार्यरत आहेत.संशयाच्या आधारे सध्या ३ जणांची कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती वर्ध्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली.
शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर मुलीच्या अमानुष हत्येमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुसरीकडे या घटनेनंतर गावात प्रचंड संतापाचे वातावरण असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.