Chandrashekhar Bawankule
नागपूर - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आमच्यासारख्या लोकांना, विश्वाला प्रेरणा दिली. मात्र राहुल गांधी जेव्हा सावरकरांविषयी वाईट पद्धतीने बोलतात त्यावेळी उद्धव ठाकरे त्यांना पाठिंबा देतात, आदित्य ठाकरे त्यांना मिठी मारतात. मुळात त्यांनी आता धडा घेत महाराष्ट्राची आणि देशाची माफी मागितली पाहिजे. असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
पहलगामच्या घटनेत ज्यांचा जीव गेला त्या एका तरी परिवाराशी शरद पवार भेटले आहेत का? त्यांना विचारलं का काय झालं म्हणून? मतांच्या लांगूलचालनासाठी शरद पवारांनी असे करू नये असेही टीकास्त्र सोडले. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर तो त्यांचा अधिकार आहे, महाराष्ट्रात कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत युती करायची हा त्यांचा अधिकार आहे. त्यांची युती होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही. आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे. त्यांच्या युतीवर मी काही बोलणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना केंद्र सरकारने डेडलाईन दिली आहे, त्यांना भारत देश सोडावाच लागेल. या देशात राहून पाकिस्तानचा जयजयकार चालणार नाही, जेव्हा पाकिस्तान जिंकतो तेव्हा फटाके फोडतात, अशी ही वृत्ती मोडून काढलीच पाहिजे, पाकिस्तान जिंकल्यानंतर भारतात पाकिस्तानचे झेंडे फडकवणे हे भारताला मान्य नाही.
काल मला काँग्रेसच्या एका नेत्याने विचारले, की तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजे. त्यावेळी मी म्हटले की महाराष्ट्राला विकसित करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्र विकसित होतपर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहिले पाहिजेत. २०३४ पर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि आम्ही सगळे विकसित महाराष्ट्रासाठी एकत्र आहोत. महाराष्ट्रातील सरकार पुढचे पंधरा वर्षे आले पाहिजे. देवेंद्र फडणवीस गतिमान मुख्यमंत्री असून त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जावा अशी भावना असल्याचे बावनकुळे म्हणाले.
मे आणि जून या दोन महिन्यात आम्ही आता राज्य सरकारचे १०८ महामंडळ आहेत. ७६५ अशासकीय सदस्य आहेत. वेगवेगळ्या महामंडळावर जिल्हास्तरीय तालुकास्तरीय कमिटी आहेत. साधारणतः महायुतीमध्ये तीन ते पाच हजार कार्यकर्ते विविध पदावर येऊ शकतात. महायुतीतील सर्व नेते आणि पदाधिकारी सर्व एकत्र बसून या दोन महिन्यात सर्व शासकीय समित्या महामंडळ केंद्रीय भाजपच्या परवानगीने जाहीर करणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.