

Supreme Court to Rahul Gandhi on Savarkar Remark
लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालायने गुरूवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्यसैनिकांविषयी टिपण्णी करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
अशा वक्तव्यांची पुनरावृत्ती झाल्यास स्वतःहून (Suo Motu) कारवाई केली जाईल, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच तुमच्या आजी (माजी पंतप्रधान इंदिरा गांधी) या सावरकरांचे कौतूक करत होत्या, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
सावरकर यांच्याविषय़ी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका आदेशामध्ये राहुल गांधींविरूद्धचे समन्स रद्द करण्यास नकार दिला होता. त्याला राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
त्याविषयी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि मनमोहन यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली.
राहुल गांधींनी 17 नोव्हेंबर 2022 रोजी भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एका सभेत सावरकरांविषयी आक्षेपार्ह व्यक्त केले होते.
राहुल गांधी यांनी सावरकरांना "ब्रिटिशांचे नोकर" असे संबोधले होते आणि सावरकर ब्रिटिश सरकारकडून पेन्शन घेत होते, असे म्हटले होते.
राहुल गांधी यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, या विधानामागे द्वेष पसरवण्याचा कोणताही हेतू नव्हता. मात्र, खंडपीठाने गंभीर नाराजी व्यक्त करत म्हटले, “तुमचे क्लायंट जाणतात का की महात्मा गांधींनीसुद्धा सावरकरांबाबत 'तुमचा विश्वासू सेवक' असा शब्दप्रयोग केला होता?
त्यांना माहित आहे का की त्यांच्या आजीनेही (इंदिरा गांधींनी) सावरकरांना पत्र पाठवून त्यांचे कौतुक केले होते?”
न्यायालयाने काँग्रेस खासदाराला अशा विधानांपासून दूर राहण्याचा स्पष्ट सल्ला दिला. “तुम्ही एक राजकीय नेते आहात. मग अशा प्रकारची वक्तव्ये का करायची? करू नका. जर हेतू भडकावण्याचा नव्हता, तर असे विधान करण्याची गरजच काय?” असा सवाल खंडपीठाने केला.
सर्वोच्च न्यायालयाने अद्याप कारवाईवर स्थगिती दिली असली, तरी गांधींनी अशा प्रकारची वक्तव्ये पुन्हा करु नयेत, हे स्पष्ट केले.
“हे लक्षात ठेवा – पुढे असे विधान झाले, तर आम्ही स्वतःहून (suo moto) कारवाई करू. आम्ही कोणालाही आमच्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल अशा प्रकारे बोलू देणार नाही,” असा स्पष्ट इशारा न्यायालयाने दिला.
खंडपीठाने हेही अधोरेखित केले की, राहुल गांधींनी हे विधान महाराष्ट्रातील अकोला येथे केले होते – जिथे सावरकरांचे विशेष महत्त्व आहे.
अधिवक्ता नृपेन्द्र पांडे यांनी तक्रार दाखल करत गांधींवर भाषणात मुद्दाम सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. तक्रारीत असेही म्हटले आहे की, सावरकरांची बदनामी करण्याचा हा एक नियोजित कट होता.