

पुणे: लंडन येथील अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विशेष न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खासदार-आमदारांविरोधातील दाव्यांची सुनावणी घेणार्या विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात गांधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते.
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांना हजर राहण्यासाठी 10 जानेवारीची तारीख देण्यात आली होती. त्यानुसार, राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर झाले. त्यावर या दाव्यात जामीन मिळण्यासाठी राहुल गांधी यांच्या वतीने अॅड. मिलिंद पवार यांनी अर्ज केला होता.
विशेष न्यायालयाने हा अर्ज मंजूर करत बदनामीच्या खटल्यात वैयक्तिक 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यांच्या वतीने माजी आमदार मोहन जोशी यांनी जामीन स्वीकारला. याप्रकरणात, अॅड. पवार यांना अॅड. योगेश पवार, अॅड. हर्षवर्धन पवार, अॅड. अजिंक्य भालगरे, अॅड. सुयोग गायकवाड, अॅड. प्राजक्ता पवार-भोसले व अॅड. ज्ञानेश्वरी जाधव यांनी सहकार्य केले. पुढील सुनावणी 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे.