

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून मदत केली जात आहे. आम्हीही प्रशासनाच्या संपर्कात आहोत. जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. हे सहन न झाल्याने हा हल्ला करण्यात आला आहे. पण भारत आणि जम्मू- काश्मीर मागे वळून पाहणार नाही. कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला भारताला करता येतो. कुठल्याही परिस्थितीत देशविरोधी शक्तींचा नायनाट केल्याशिवाय भारत शांत बसणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack)
जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील निसर्गरम्य परिसर असलेल्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. नैसर्गिक सौंदर्यासाठी 'मिनी-स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशात गोळीबाराच्या घटना घडल्या. त्यामुळे सुरक्षा दलांना तातडीने तैनात करण्यात आले आहे.
दुर्गम, उंचावरील या ठिकाणी फक्त पायी किंवा घोड्यावरूनच पोहोचता येते, ज्यामुळे बचाव कार्याच अडथळे येत आहेत. जखमींना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात केले आहे. तर स्थानिकांनी जखमींना कुरणातून खाली आणण्यासाठी घोड्यांचा वापर केला. किमान १२ पर्यटकांना पहलगाम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलून सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधानांनी गृहमंत्री शहा यांना तातडीने हल्ल्याच्या स्थळी जाण्यास सांगितले आहे.
पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.