

शिरूर : मराठवाड्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी बीड जिल्ह्यासह मराठवाडा पाणीदार होणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील या पिढीने दुष्काळ पाहिला आहे. मात्र मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नसल्याचे अभिवचन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथे आज (दि.१९) दिले आहे.
बीड जिल्ह्यातील श्री. क्षेत्र गहिनीनाथ गडाचा 93 वा नारळी सप्ताह महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिरूर कासार तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून मोठ्या थाटामध्ये पार पडत होता. या सप्ताहाची सांगता आज झाली. असून या सांगतेच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना निमंत्रित करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ग्रामस्थांच्या वतीने वारकरी सांप्रदायाचा भगवा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बीड जिल्ह्याच आणि आमचे एक वेगळं नातं आहे, आणि जेव्हापासून श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर आमचे येणे होऊ लागले, तेव्हापासून या नात्याला एक वेगळ्या प्रकारचा रंग आला आहे. मागच्या काळामध्ये श्री. क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या विकासाचे कार्य हाती घेतले, ते आता बरेच पुढे गेलेले असून आणखी भरपूर कामे त्या ठिकाणी करायची बाकी आहेत. पंकजाताई म्हणाल्या त्याप्रमाणे गडाचा आणि गडाच्या प्रत्येक भाविकांचा विकास झाला पाहिजे.
आपले जे हक्काचं कृष्णेचे पाणी होते ते पाणी आपण आष्टीमध्ये आणण्याचा निर्णय केला. आजचे पाणी आष्टी पर्यंत पोहोचत आहे. घाटशिळ पारगावकरांनी कुकडीतून पाण्याची मागणी केली आहे. समुद्रात वाहून जाणारे 53 टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्यासाठी आम्ही मान्यता दिलेली आहे. या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी हे काम आम्ही सुरू करणार आहोत.
कृष्णा-कोयनेला पूर येतो त्या पुराचं पाणी आम्ही वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून, वळण बंधाऱ्याच्या माध्यमातून या परिसरामध्ये आणण्याच्या योजनेला मान्यता दिलेली आहे. मे महिन्यांमध्ये त्याचे टेंडर देखील काढत आहोत.
यावेळी हभप. महंत विठ्ठल महाराज शास्त्री आ. सुरेश धस, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. मोनिका राजळे आ. नमिता मुंदडा, माजी आ.भीमराव धोंडे, प्रताप ढाकणे, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, लक्ष्मण हाके, विभागीय आयुक्त गावडे, वप्स बोर्डाचे अध्यक्ष समीर भाई काजी, भाजप ज्येष्ठ नेते रामराव खेडकर, बाबुराव केदार, प्रकाश खेडकर, माजी सरपंच वैजनाथ खेडकर, सरपंच नवनाथ खेडकर आदींची उपस्थिती होती.
श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घ्यावा. ज्यामुळे गडाचा सर्वांगीण विकास होईल. बीड जिल्हा सुजलाम सुफलाम होईल, अशी मागणी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड दत्तक घ्यावा. आणि गडाबरोबरच भाविकांचाही विकास करावा असे विधान मंत्री पंकजा मुंडे यांनी केले मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडाला दत्तक घेण्याची माझी ऐपत नाही, आणि माझी औकातही नाही. या उलट गडांनीच मला दत्तक घेतले तर गडाचा विकास करणे मी माझे कर्तव्य समजेल आणि गडासह येथील भाविकांचाही विकास करील , असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्या त्या विधानाचे त्याच व्यासपीठावर खंडन केले.