विदर्भ

Yellow Alert In Vidarbha : विदर्भात पावसाचा जोर मंदावला; दोन दिवस यलो अलर्ट

अविनाश सुतार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : विदर्भात मागील २४ तासांपासून पावसाचा जोर मंदावला असला तरी येत्या २४ ऑगस्टपर्यंत सरासरी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गुरूवारी (दि.१८) विदर्भात यलो अलर्ट (Yellow Alert In Vidarbha) देण्यात आला आहे. मात्र, आतापर्यंत झालेल्या पावसामुळे विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या पाच जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. महिनाभरापासून सुरू असलेल्या संततधार व अतिवृष्टीमुळे ११ लाख हेक्टरमधील पीक वाहून गेले आहे. अमरावती विभागात ६ लाख ३० हजार आणि नागपूर विभागात ४ लाख ७९ हजार हेक्टरमध्ये नुकसान झाले.

(Yellow Alert In Vidarbha) प्रादेशिक हवामान खात्यानुसार, आता विदर्भात पाऊस सुरुच राहणार आहे. मात्र, पावसाचा जोर मंदावणार असून पर्जन्यमान सरासरीच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तविली आहे. विदर्भात १८ ऑगस्टरोजी सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा तसेच तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात असलेल्या ५२ लाख हेक्टर शेतजमिनी पैकी ११ लाख हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पंचनाम्यानंतर नुकसान झालेल्या शेतीचे क्षेत्रफळ आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Yellow Alert In Vidarbha : विदर्भातील सर्वाधिक नुकसान यवतमाळ जिल्ह्यात

विदर्भात सुमारे ५२ लाख हेक्टरमध्ये कापूस, सोयाबीन, धान, तूर आदी प्रमुख पीक आहेत. जुलैच्या १० तारखेपासून सुरू झालेल्या पावसाने कालपर्यंत उसंत घेतली नाही. विदर्भातील सर्वाधिक नुकसान यवतमाळ जिल्ह्यात झाले आहे. येथील ३ लाख हेक्टरहून अधिक पीक वाहून गेले. तर, या खालोखाल अमरावती जिल्ह्यात २ लाखांहून अधिक हेक्टरमधील पीक हातातून गेले.

पूर्व विदर्भात सर्वाधिक नुकसान वर्धा जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. चंद्रपूरमध्ये सुमारे १ लाख ५२ हजार हेक्टर तर, नागपूर जिल्ह्यात १ लाख २० हजार हेक्टरचे नुकसान झाले. या व्यतिरिक्त ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धान उत्पादक गडचिरोली जिल्ह्य़ात २६ हजार हेक्टर, भंडारा जिल्ह्यात १२ हजार हेक्टर तर गोंदियात खूपच कमी नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली. अकोला व वाशीममध्ये प्रत्येकी ६० ते ७० हजार हेक्टरपर्यंत नुकसान झाले आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT