विदर्भ

गडचिरोली : मैत्रिणीसोबत जंगलात जाणं बेतले जीवावर ; वाघाच्या हल्ल्यात तरुण ठार

अविनाश सुतार

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा : मैत्रिणीसह जंगलात गेलेल्या तरुणाला वाघाने हल्ला करुन ठार केले. ही घटना आज (दि.३) दुपारी २ च्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर-उसेगाव रस्त्यावरील जंगलात घडली. अजय सोमेश्वर नाकाडे (वय २४, रा. चोप, कोरेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अजय नाकाडे आज चारचाकी वाहनाने एक मित्र आणि मैत्रिणीसह उसेगाव येथील जंगलात गेला होता. अजयचा मित्र वाहनात बसून होता, तर अजय आणि त्याची मैत्रिण जंगलात गेले होते. एवढ्यात दबा धरुन बसलेल्या वाघाने अजयवर हल्ला केला. झाडाची फांदी पडली असेल, म्हणून मैत्रिणीने मागे वळून बघितले असता तिला वाघ दिसला. वाघाने अजयच्या नरडीचा घोट घेऊन त्याला फरफटत दूरवर नेले. या झटापटीत त्याच्या मैत्रिणीलाही ओरबाडले. मैत्रिण धावत वाहनाजवळ आली. त्यानंतर अजयचा मित्र आणि मैत्रिणीने उसेगाव येथील नागरिकांना ही घटना सांगितली.

काही वेळातच गावकरी, वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक महेश मेश्राम आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांना अजयचा मृतदेह जंगलात एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाघाने फरफटत नेल्याचे आढळून आले. संध्याकाळी शवविच्छेदन केल्यानंतर आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते वनविभागाकडून अजयच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.

फलकाजवळच उभे केले वाहन

शिवराजपूर-उसेगाव रस्त्यावर घनदाट जंगल आहे. या जंगलात नरभक्षक वाघाचा वावर आहे. काही महिन्यांपूर्वी वाघाने एका व्यक्तीला ठार केले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाने या परिसरात 'नरभक्षक वाघापासून सावधान' असा फलक लावला आहे. परंतु अजय आणि त्याच्या मित्राने नेमके त्याच ठिकाणी वाहन उभे केले आणि त्याच जंगलात गेले. परिणामी अजयला जीव गमवावा लागला.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT