चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा
मिशन शौर्य २०१८ अंतर्गत जिवती, कोरपना तालुक्यातील पाच विद्यार्थ्यांनी जगातील सर्वाधिक उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर केले. तत्कालीन सरकारने त्यांना नोकरीचे आश्वासन दिले होते. मात्र राज्यात संत्तातरण झाले आणि एव्हरेस्ट वीरांच्या नोकरीचा प्रश्न शासन दरबारी धूळ खात पडला आहे. त्यांना शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार गृह विभागात नोकऱ्या केव्हा मिळणार, याच्या प्रतीक्षेत तीन वर्षांपासून एव्हरेस्ट वीर आहेत.
राज्याचे तत्कालीन अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. दयानिधी राजा यांच्या उत्कृष्ट नियोजनातून आदिवासी विकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने मिशन शौर्य -२०१८ हे अभियान राबविण्यात आले.
या अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील उपक्रमाअंतर्गत राजुरा विधानसभा क्षेत्रातील जिवती व कोरपना या अतिदुर्गम आदिवासीबहुल भागातील १० पैकी ५ विद्यार्थ्यांनी जगातील सर्वाधिक उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर केले. त्यांनी एव्हरेस्ट शिखरावर झेंडा रोवून देशाचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या उत्तुंग कामगिरीमुळे महाराष्ट्राची, जिल्ह्याची आदिवासी विकास विभागाची, तालुक्याची मान अभिमानाने उंचावली.
जिल्ह्याची मान गर्वाने उंचावल्याने त्या पाचही पंचरत्नांना गृह विभागात नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तांतरानंतर आश्वासन हवेत विरले आहे. अजूनही एव्हरेस्ट वीर आशावादी आहेत, पण त्यांचा आशावाद कधी आणि कोण पूर्ण करणार? असा प्रश्न जिल्ह्यात विचारला जातो आहे.
हेही वाचलं का?