

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : Karnataka Corona Rules : राज्यात कोरोना संसर्ग, ओमायक्रॉन संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. गुरुवारी नवीन मार्गसूची जारी करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
कृष्णा निवास स्थानातील गृहखात्याच्या कार्यालयात सरकारचे मुख्य सचिव रविकुमार, अर्थ खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. एन. प्रसाद व अधिकार्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.
कोरोनाच्या दुसर्या लाटेवेळी विविध खात्यांकडून मोठा खर्च करण्यात आला आहे. यामध्ये अपेक्षेपेक्षा अधिक खर्च झाला असून तो खर्च देण्याची सूचना अर्थखात्याला करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिली.
राज्यात कोरोनासंदर्भात नवीन मार्गसूची जारी करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. मार्चपर्यंत कोरोना संसर्ग निवारण्यासाठी तयारी करण्याबरोबरच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. उद्या होणार्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नवीन मार्गसूची जारी करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काही जिल्ह्यांमध्ये ओमायक्रॉन दिसून आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मार्गसूचीवर चर्चा करून संपूर्ण राज्यात की काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध लावावेत, याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.
शाळांसंदर्भात स्वतंत्र मार्गसूची जारी करण्यात येणार आहे.
शाळा, महाविद्यालये व वसतिगृहांसाठी प्रत्येकी स्वतंत्र मार्गसूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भीतीचे कारण बाळगू नये.
शाळा आणि विद्यार्थी वसतिगृहामध्ये अधिक लक्ष देऊन, स्वच्छता पाळून कोरोना नियमांचे सक्तीने पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे.
पालक आणि शिक्षकांनी लसीचे 2 डोस घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाचा नवा व्हायरस ओमायक्रॉन संसर्ग रोखण्यासाठी बूस्टर डोस देण्यासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली.
याबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार असून, तज्ज्ञांसोबत चर्चा करून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखविले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून थर्टीफर्स्ट तसेच नव्या वर्षाचे स्वागत करण्यावर निर्बंध आले होते.
आता नव्या व्हायरसमुळे पुन्हा थर्टीफर्स्टवर निर्बंध येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
परंतु, याबाबत अद्याप कोणताच निर्णय झाला नसल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.