प्रमाणापेक्षा जास्त व्यायामाने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, ‘ही’ घ्या काळजी

प्रमाणापेक्षा जास्त व्यायामाने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, ‘ही’ घ्या काळजी

हिवाळ्यात हवामान आनंददायी आणि थंड असते. मात्र, या थंडीच्या महिन्यांत अनेकांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो म्हणून सतर्क राहणे गरजेचे आहे. तापमानात अचानक आणि अनपेक्षित घट झाल्याने हृदयावर ताण येऊ शकतो आणि शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊन रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात.

शरीरात पुरेसे रक्त आणि ऑक्सिजन पंप करण्यासाठी हृदयाला कठोर परिश्रम करावे लागते. त्यामुळे हृदयाला अतिरिक्त काम करण्यासाठी अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते. जर तुम्हाला आधीच कोरोनरी धमनी रोगाचे निदान झाले असेल किंवा 65 वर्षांपेक्षा जास्त वय असेल, तसेच मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असेल तर तुम्हाला हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. कधीकधी ते जीवघेणेदेखील ठरू शकते.

हिवाळ्यात हृदयाच्या समस्या

हिवाळ्यात कमी तापमानामुळे रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ज्यांना त्यांच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या हृदयाच्या स्थितीबद्दल माहिती नाही त्यांनाही या थंडीच्या महिन्यांत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. इतकेच नाही तर थंड वातावरणामुळे कोरोनरी धमन्या आकुंचन पावू शकतात, हृदयविकाराचा त्रास किंवा छातीत दुखणेसुद्धा कालांतराने बळावते. यामुळे व्यक्तीला त्याची दैनंदिन कामे सहजतेने पार पाडणे कठीण होते.

शिवाय, जेव्हा एखाद्याच्या शरीराचे तापमान 95 अंशांपेक्षा कमी होते तेव्हा त्याला/तिला हायपोथर्मियादेखील होतो. ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंवर परिणाम होऊ शकतो. हायपोथर्मिया दरम्यान, एखाद्याच्या शरीरात उष्णता कमी होते आणि शरीराच्या तापमानात धोकादायक घट होते जी जीवघेणी असते. खूप जास्त ताणतणाव देखील हृदयावर परिणाम करू शकतात आणि प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढू शकते.
थंडीच्या महिन्यांत हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी ही खबरदारी घ्यावी.

* घरीच रहा : हिवाळा असल्याने, बाहेर थंड वारा असेल तेव्हा तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आणि घरातच राहावे लागेल. वातावरण थंड असताना सकाळी लवकर व्यायाम करू नका. घरातल्या घरात व्यायाम ही एक चांगली कल्पना असू शकते. घर उबदार राखा. लोकरीचे कपडे, टोप्या आणि हातमोजे घाला. हिवाळ्यात व्यायाम करताना काळजी घ्या. प्रमाणापेक्षा जास्त व्यायामाने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. कोणतीही कठोर फिटनेस सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांशी बोलावे.

रक्तदाब तपासा : हृदयविकाराचा झटका येण्यामागे उच्च रक्तदाब हे मुख्य कारण आहे.

धूम्रपान आणि मद्यपान टाळावे : अल्कोहोल त्वचेतील रक्तवाहिन्यांच्या विस्तारास कारणीभूत ठरतो. धूम्रपानामुळे एथेरोस्क्लेरोसिस होतो, हृदयाकडे ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो. ज्यामुळे उच्च रक्तदाब होतो.

तणावमुक्त रहा : तणावमुक्त रहाण्यासाठी योगसाधना आणि ध्यानधारणा करा, कुटुंबासोबत काही वेळ घालवा आणि तुम्हाला आवडतील असे छंद जोपासा.

डॉ. बिपीनचंद्र भामरे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news