विदर्भ

चंद्रपूर : वाघांच्या बंदोबस्ताकरिता वन विभागाच्या विरोधात राष्ट्रवादीचा आज आक्रोश मोर्चा

मोहन कारंडे

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मुल तालुक्यातील जंगलव्याप्त गावामध्ये वाघांचा प्रचंड धुमाकूळ सुरू असून आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहेत. वनविभाग मात्र वाघांच्या बंदोबस्तासाठी अपयशी ठरत असल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे शेतकरी, शेतमजूर व नागरिकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूलच्या वतीने आज बुधवार (दि. ४) सकाळी ११ वाजता वनविभाग व महसूल प्रशासनाच्या विरोधात तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुल तालुक्यातील दहेगाव, कांतापेठ, चिरोली, कावडपेठ, उथळपेठ यासह अन्य गावे बफर झोन व एफडीसीएम क्षेत्राला लागून आहेत. त्यामुळे या परिसरात वाघ बिबटे, अस्वल व अन्य वन्यजीवांचा नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कांतापेठ येथील एका गावातील दोघांचा वाघांनी बळी घेतला. गावे व शेतशिवार जंगलाला लागून असल्यामुळे वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ‌आठवडाभरापूर्वी चिरोली वनपरक्षेत्र कार्यालयावर महिलांनी धडक देऊन वाघांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. प्रशासनाविरोधात नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. त्यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुमित समर्थ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूलच्या वतीने आज ११ वाजता गांधी चौकातून आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे.

ज्या गावांमध्ये वाघांनी धुमाकूळ घातला आहे, तेथील वाघांना जेरबंद करा, बफर झोनला तारेचे वॉल कंपाऊंड करा, वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नोकरी द्या, वन्यप्राणी गावाजवळ आल्यास त्याला तात्काळ जेरबंद करा, शेतमालाची नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांचे गुरेढोरे जंगलात चराई करता जंगल आरक्षित करा, शेतकऱ्यांना आपल्या जीवाची व शेत मालाची रक्षा करण्याकरीता हत्यार बाळगण्याची परवानगी द्यावी, यासह अन्य मागण्या या मोर्चात करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT