यवतमाळ : जागेच्या वादातून हल्ला; मुलगा ठार, वडील गंभीर जखमी | पुढारी

 यवतमाळ : जागेच्या वादातून हल्ला; मुलगा ठार, वडील गंभीर जखमी

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा; जागेच्या वादातून संतापलेल्या पुतण्याने लोखंडी रॉडने काकाला बेदम मारहाण केली. वडिलांना सोडविण्यासाठी मुलगा मध्ये आला असता त्याच्यावरही रॉडने डोक्यावर प्रहार केले. दोघेही बाप- लेक जागेवर निपचित पडल्यानंतर आरोपी पुतण्या तेथून पसार झाला. ही थरारक घटना यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा मार्गावर दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.

राहुल नरेंद्र पाली (वय २४, रा. शारदा चौक) असे मृताचे नाव आहे. तर नरेंद्र जगन्नाथ पाली (५५) हे गंभीर जखमी आहेत. नरेंद्र पाली यांचे टायर रिमोल्डिंगचे दुकान आहे. त्याला लागून घर होते. या घराच्या जागेवरूनच वाद सुरू होता. नरेंद्र पाली यांच्या शेजारी त्यांचा मोठा भाऊ जगदीश पाली यांच्या परिवाराचे वास्तव्य आहे. नरेंद्र पाली यांनी जुने घर तोडून दुकानाला लागून बांधकाम सुरू केले. मंगळवारी या ठिकाणी बांधकामावर मजूर होते. तसेच तेथे बोअरवेल खोदण्याचे काम केले जात होते. अचानक पुतण्या सुरज जगदीश पाली हा तेथे आला. त्याने जागेवरून वाद घालत हातातील लोखंडी रॉडने नरेंद्र पाली यांच्यावर प्रहार केला. त्यांना वाचविण्यासाठी राहुल पुढे आला असता राहुलच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले. यात राहुल रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच कोसळला. नंतर आरोपीने नरेंद्र पाली यांच्या चेहऱ्यावर रॉडने वार केले. यात नरेंद्र पाली यांचा चेहरा पूर्णत: छिन्नविछीन्न झाला.  हा मारहाणीचा प्रकार सुरू असताना कामावरील मजूर, बोअरवेल खोदणारे तेथून पळून गेले. बघ्यांची मोठी गर्दी जमली. मात्र, कुणीही मदतीला धावून आले नाही. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेतील जमादार अजय डोळे, शहर ठाण्यातील सुरज साबळे, गजानन क्षीरसागर व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
तातडीने जखमींना उचलून वाहनात टाकण्यात आले. रस्त्यावरील वाहन थांबवून जखमींना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी राहुल पाली याला मृत घोषित केले. तर नरेंद्र पाली यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. दरम्यान, या गंभीर घटनेची माहिती आकाश पाली याने नरेंद्र पाली यांची पत्नी रजनी यांना दिली. त्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. सुरज पाली व त्याची आई माधुरी जगदीश पाली (वय ५०) यांनी जागेच्या मोजमापावरून वाद घालून हल्ला केल्याची तक्रार रजनी पाली यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
हेही वाचा

Back to top button