Nilipari ST reached for the first time after independence
मोहाडी तालुक्यातील ग्राम पांजरा गावात एसटी महामंडळाची बस पहिल्यांदाच पोहोचली. बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थ आणि खास करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
भंडारा

स्वातंत्र्यानंतर ग्राम पांजरा गावात पहिल्यांदाच पोहोचली निळीपरी एसटी

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : देशभरात विकासाच्या दृष्टीकोनातून विविध कार्य सुरू आहेत. मेट्रोपासून-बुलेट ट्रेनपर्यंतची सेवा जनतेला उपलब्ध करून देण्याचं कार्य प्रगतीपथावर आहे. पण, काही असेही भाग आहेत जिथे रेल्वे तर सोडाच साधी बससेवाही उपलब्ध नाही. अशाच एका गावात शनिवारी एसटी महामंडळाची बस पहिल्यांदाच पोहोचली. तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र हे खरे आहे.

मोहाडी तालुक्यातील ग्राम पांजरा हे आडमार्गातील गाव. तुमसर आगारातून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम पांजरा गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मानव विकास योजनेची निळी परी पोहोचली. पहिल्यांदा बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थ आणि खास करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मोहाडी तालुक्यातील पांजरा ग्रामपंचायत येथील गावाच्या दोन ते तीन किमी अंतरावर असलेल्या रामटेक राज्य मार्गावरून एसटी बसच्या फेऱ्या होतात. परंतु, वर्षानुवर्षे ग्राम पांजरा येथील गावातील नागरिकांना विविध कामांसाठी तीन किलोमीटरचा पायी प्रवास करून कांद्री किंवा वासेरा येथे एसटी बस पकडण्यासाठी यावे लागते.

तसेच इयत्ता चौथीनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कांद्री ,जांब तुमसर येथे जाण्यासाठी नेहमीच दमछाक होत असे. विशेषतः चौथ्या वर्गानंतर विद्यार्थ्यांना लहान मुलांना पायपीट करत अथवा सायकलने पायी जावे लागायचे. मात्र या गावासाठी शिक्षण सभापती रमेश पारधी यांच्या प्रयत्नातून मानव विकास योजनेची बस चालू झाली.

या गावातील जनतेच्या आनंदाला पारावर उरला नाही. ग्राम पांजरा गावात पहिल्यांदा एसटीची निळी परी घेऊन आलेल्या चालक-वाहकांचे गावकऱ्यांनी सत्कार केला. बससमोर नारळ फोडून पूजा केली. तसेच गावात नागरिकांनी आनंद यात्रा काढली. यावेळी शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी प्रवास केला. यावेळी ग्राम पांजराचे अध्यक्ष महेंद्र मते, जिल्हा काँग्रेस कमेटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष शंकर राऊत, अमर रगडे, तालुका अध्यक्ष प्रमोद कटरे, शहर अध्यक्ष जितेंद्र बावनकर, शिव बोरकर, महेंद्र मेश्राम, शशिकांत नागफासे, गजानन झंझाड उपस्थित होते.

मुलींसाठीच बस सेवा

मानव विकास योजनेची बस सुविधा फक्त मुलींसाठीच आहे. त्या गावातील तेरा ते पंधरा विद्यार्थिनी चौथीनंतर पुढील शिक्षणासाठी आता गावातूनच बस मधून शाळेपर्यंत मोफत प्रवास करणार आहेत. गावातील नागरिक व मुलांसाठी ही सुविधा नसणार आहे.

SCROLL FOR NEXT