मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोडींमुळे मुख्य सचिव नितीन करीर यांनी लोकलने प्रवास केला.  Pudhari News Network
ठाणे

मुंबई-नाशिक महामार्गावर खड्डे; मुख्य सचिवांनी केला लोकलने प्रवास

वाहनांच्या लांबचलांब रांगा, वाहतूक कोंडी

पुढारी वृत्तसेवा

कसारा : शाम धुमाळ: मुंबई - नाशिक महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज पसरले आहे. तर दुसरीकडे महामार्गावरील आसनगाव हद्दीत संथ गतीने रेल्वे ब्रिजचे काम सुरू आहे. तसेच वशिंदमध्ये चालू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. महामार्गावरील चेरपोलीघाट, शहापूर, आसनगाव ते वशिंदपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. याचा फटका रुग्णवाहिका, स्कूलबसला बसत आहे. दरम्यान, याचा फटका राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना देखील बसला. त्यामुळे त्यांनी आज (दि.३०) कसारा रेल्वे स्थानकावरून लोकलने प्रवास करणे पसंद केले. नाशिकहून येत असताना त्यांनी आपला ताफा कसारा रेल्वे स्थानका कडे वळवला. आणि कसाराहून मुंबईसाठी दुपारी दीडची लोकल पकडली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणा हवेतच

मुंबई - नाशिक महामार्गांवरील कामाची २८ जुलै २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना आदेश देऊन घटनास्थळाची पाहणी केली होती. मात्र, त्यांचे आदेश आजही कागदावरच असल्याचे पहिल्याच पावसात दिसून आले. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून चालकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. मुख्यमंत्र्यांचे आदेश कागदावरच असल्याची चर्चा वाहन चालक करताना दिसत आहे.

विरुद्ध दिशेने वाहने घातल्याने दोन्ही लेन जाम

गेल्या ८ ते १० वर्षापासून मुंबई- नाशिक मार्गमार्गचे आठ पदरी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे. नाशिक, ठाणे, मुंबई या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. त्यातच नाशिक वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने घातल्याने दोन्ही लेन पूर्ण जाम होत आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई- नाशिक महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे याकडे लक्ष द्यावे. या कामात विलंब होऊ नये, रस्त्याच्या कामात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ जुलै २०२३ संबंधित यंत्रणांना दिले होते. तसेच कामाला गती द्या, दर्जेदार काम होण्याकडे लक्ष द्या, वाहतुकीचे नियमन करा तसेच खड्डेमुक्तीसाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स यापूर्वीच स्थापन केला होता.

मुख्यमंत्र्यांच्या सुचनेला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केराची टोपली

टास्क फोर्सने नियमित बैठका घेऊन खड्डेमुक्तीच्या मोहिमेला गती द्यावी. वाहतुकीच्या नियंत्रण-नियमनाकडेही लक्ष द्यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत दिले होते. अवजड वाहने व मालवाहतुकीच्या वाहनांसाठी वेळेचे नियोजन करा. हाईट बॅरियर लावण्यात यावीत. महामार्गांच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्यात यावीत. वाहतूक नियमनासाठी वॅार्डनची नियुक्ती करण्यात यावी, अशा अनेक सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या या सुचनेला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने केराची टोपली दाखवली.

ठेकेदार, पोट ठेकेदारांना ५ कोटींचा दंड

मुंबई- नाशिक महामार्गाच्या निकृष्ट कामामुळे ठेकेदार, पोट ठेकेदार यांना मागील वर्षी ५ कोटींचा दंड केला होता. परंतु दंड वसूल न करता त्याच ठेकेदारांना अभय देण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करीत असल्याचा आरोप होत आहे. तर खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांची मात्र दमछाक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT