नाशिक : खर्च जबाबदारीवरून अडली पूररेषेची फेरआखणी

खर्चाच्या वादामुळे नाशिकमध्ये पूररेषेची फेरआखणी रखडली
nashik-godavari
नाशिक गोदावरीfile photo
नाशिक : आसिफ सय्यद

२००८ मध्ये मानवी चुकांमुळे उद्भवलेल्या महापुराच्या आधारे गोदावरी नदीच्या दोन्ही काठांवर आखण्यात आलेल्या पूररेषेच्या च्रकात अडकलेल्या बांधकामांची विशेषत: जुने नाशिक व पंचवटीच्या गावठाणातील शेकडो वाडे व घरांची पूररेषेच्या दुष्टचक्रातून सुटका करण्यासाठी पूररेषेची फेरआखणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला खरा, मात्र त्यासाठी जलसंपदा विभागाने मागणी केलेल्या अवघ्या ३० ते ३५ लाखांच्या खर्चाची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे पूररेषेतील हजारो बांधकामधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. पूररेषेमुळे ही बांधकामे अनधिकृत ठरली असून, मोडकळीस आलेल्या जुने वाडे, घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर झाला आहे.

२००८ मध्ये गंगापूर धरणातील पाण्याच्या विसर्गाचा अंदाज न आल्यामुळे गोदावरीला महापूर आला होता. कालांतराने हा पूर यंत्रणेच्या तांत्रिक चुकांमुळे आल्याचे स्पष्ट झाले. मात्र या महापुराच्या आधारे जलसंपदा विभागाने तयार केलेल्या निळ्या व लाल पूररेषेमुळे नदीकाठची हजारो बांधकामे बाधित झाली. विशेषत: जुने नाशिक व पंचवटीतील गावठाण भागातील जुने वाडे, घरे या पूररेषेच्या चक्रात अडकली. या बांधकामांच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या घरांमध्ये जीव मुठीत धरून राहण्याशिवाय नागरिकांना पर्यायच उरलेला नाही. ही पूररेषा सर्वमान्य न झाल्यामुळे या पूररेषेची फेरआखणी करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात मंत्र्यांनी बैठका घेत महापालिका आणि जलसंपदा विभागाला पूररेषेच्या फेरआखणीचे आदेशही दिले होते. यासंदर्भात महापालिकेने जलसंपदा विभागाकडे प्रस्तावही सादर केला आहे. मात्र पूररेषेच्या फेरआखणीसाठी सुमारे ३० ते ३५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या खर्चाची जबाबदारी महापालिकेने उचलावी, अशी मागणी जलसंपदा विभागाची आहे. मात्र यापूर्वीच्या पूररेषेकरिता महापालिकेने खर्च केलेला असल्यामुळे नव्याने खर्च अदा करण्याची आवश्यकता नसल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पूररेषाबाधित बांधकामांची अडचण मात्र कायम राहिली आहे.

गोदेला असा येतो महापूर

पुरातन काळापासून पूरमापनासाठी दुतोंड्या मारुती किंवा नारोशंकराची घंटा परिमाण म्हणून गणले जाते. गंगापूर धरणातून सुमारे 15 हजार क्यूसेसहून अधिक विसर्ग झाल्यास गोदावरी नदीला पूर येतो. या दरम्यान जोरदार पाऊस सुरू असल्यास अहिल्यादेवी होळकर पुलापर्यंत अन्य लहान-मोठ्या नद्यांमधील पाणी मिसळून हा विसर्ग २० हजार क्यूसेसच्या जलपातळीवर जातो. त्यामुळे गोदापात्रातील दुतोंड्या मारुती पुराच्या पाण्याखाली डुबतो. नारोशंकराच्या घंटेला पुराचे पाणी लागते तेव्हा गोदावरीला महापूर आल्याचे सांगितले जाते.

Nandini
नंदीनीfile photo

पूररेषेची सद्यस्थिती

गत २५ वर्षांत आलेल्या सर्वात मोठ्या पुराचा आधार घेऊन निळी पूररेषा, तर गत १०० वर्षांत आलेल्या महापुराचा आधार घेऊन लाल पूररेषा निश्चित केली जाते. सद्यस्थितीत गोदावरी नदीची निळी पूररेषा समुद्रसपाटीपासून ५६३ मीटर उंचीवर, तर लाल पूररेषा ५६७ मीटरवर आखण्यात आली आहे.

पूररेषेच्या फेरआखणीकडे दुर्लक्ष

तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी दोन वर्षांपूर्वी गोदावरी नदीच्या पूररेषेची फेरआखणी करण्याचा निर्णय घेतला होता. जलसंपदा विभागाकडे 'हेकरा' हे सॉफ्टवेअर असून, याद्वारे पूररेषेची आखणी करून निळी व लाल पूररेषा निश्चित केली जाते. सॉफ्टवेअरचा वापर करून गोदावरीच्या पूरपातळीची फेरआखणी करण्याचे निर्देश पवार यांनी दिले होते. यासंदर्भातील प्रस्ताव जलसंपदाकडे पाठविण्यात आला होता. मात्र त्यानंतर पवार यांची बदली झाल्यामुळे पूररेषेच्या फेरआखणीचा प्रस्तावही बासनात गेला. पवार यांच्यानंतर आलेल्या आयुक्तांचे या प्रस्तावाकडे दुर्लक्ष झाले.

...तर पूरप्रभाव क्षेत्र एका क्लिकवर

पूररेषेची हेकरा सॉफ्टवेअरचा वापर करून फेरआखणी करताना प्रत्येक फुटावर रेखांकन केले जाणार आहे. त्यानंतर रेखांकन केलेले सर्व पॉइंट्स एकत्रित कंट्रोल मॅप तयार केला जाईल. त्यानुसार नगररचना विभाग वाढत्या पाणी पातळीनुसार कोणकोणत्या भागामध्ये पाणी घुसू शकते, किती घरे पाण्याखाली जाऊ शकतात याचा सविस्तर आराखडा तयार करेल. त्यानंतर भविष्यात एका क्लिकसरशी महापालिकेला सर्व डाटा उपलब्ध होऊन पूर प्रभावित क्षेत्रामध्ये आगाऊ उपाययोजना करता येईल व जेणेकरून नुकसान टाळता येईल, अशी योजना आहे.

उपनद्या दुसऱ्या टप्प्यात

पहिल्या टप्प्यात गोदावरी नदीच्या पूरपातळीचे रेखांकन केले जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात नंदिनी, वालदेवी व वाघाडी या तीन उपनद्यांच्या पूरपातळीचे रेखांकन केले जाणार आहे. जलसंपदामार्फत रेखांकन करून केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्रा (सीडब्ल्यूपीआरएस) मार्फत तपासणी केली जाईल. याद्वारे प्रत्येक फूटनिहाय वाढणाऱ्या पूरपातळीनुसार पूरप्रभाव क्षेत्राची माहिती होऊ शकणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news