पाली : येत्या 22 जानेवारी रोजी माघी गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त पालीतील श्री बल्लाळेश्वर आणि महड येथील श्री वरदविनायक या दोन अष्टविनायक देवस्थानांवर माघी गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. माघी गणेश जयंतीनिमित्त येथ विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून लाखो भाविक उपस्थिती लावणार असल्याचे देवस्थान व्यवस्थापनांकडून सांगण्यात आले.
पाली येथील श्री बल्लाळ विनायकाच्या माघ मासोत्सव 19 ते 23 जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे. भक्तांची प्रचंड गर्दी लक्षात घेता श्री बल्लाळेश्वर देवस्थानाच्या वतीने गणरायाचे दर्शन सर्वांना घेता यावे व लांब रांग लागून गैरसोय होवू नये म्हणून रांगांमध्ये गणेशभक्तांना उभे राहण्यासाठी देवस्थानच्या मठीमध्ये, बाहेरच्या बाजूस व हायस्कूलच्या मैदानावर मंडपाची व्यवस्था केली आहे. तर आकर्षक कमानी आणि विद्युत रोषणाईची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे.
सुधागड तालुक्यातील पाली शहरात दिवसेंदिवस उभ्या रहात असलेल्या इमारतींमुळे जागा कमी होत असल्याने गणेश भक्तांच्या वाहनांच्या पार्किंग संदर्भात तहसिलदार उत्तम कुंभार, पोलीस निरिक्षक हेमलता शेरेकर आणि श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे सरपंच जितेंद्र गद्रे व विश्वस्त यांच्या संयुक्त सभेत चर्चा व प्रत्यक्षात जागेची पहाणी करण्यात आली. उत्सवाच्या काळात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असुन याकामी 8 पोलीस अधिकारी, 53 पोलीस हवालदार, 41 वाहतूक नियंत्रक पोलिस, रॅपिड अँक्शन फोर्स, राखीव फोर्स, दंगल नियंत्रण पथक, घातपात विरोधी पथक आणि उपविभागीय पोलीस अधिक्षक आणि पोलीस निरिक्षक असे दोन अधिकारी आहेत. सर्व जनतेचा सहभाग असणारी सायंकाळच्या वेळी ‘श्रीं’ च्या पालखीची भव्य मिरवणूक 22 जानेवारी रोजी बँड पथक, भजन या वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते.=
या दिवशी ‘श्रीं’ स महानैवद्य आणि दुसऱ्या दिवशी सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ असणाऱ्या या उत्सवात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतच्या सर्व वयोगटात आनंदाचे उधाण आलेले असते. या उत्सवात होणाऱ्या गर्दीची रांग लांबच लांब लावून दिवसभरात हजारो गणेश भक्त श्रींचे दर्शन घेतात. विनायकी चतुर्थीला पाली येथील श्री बल्लाळेश्वराच्या मंदिरात गजानन मध्यरात्री प्रत्यक्ष भोजनास येतात अशी श्रद्धा असल्याने या दिवशी भक्तांची विशेष गर्दी असते.
उत्सवाच्या काळात संशयास्पद हालचाल करणारा अनोळखी इसम आपल्या नजरेत आला किवा अनोळखी वस्तुला हात न लावता, घेण्याचा मोह टाळुन पोलीसांना माहिती दया असे आवाहन पोलीस निरिक्षक हेमलता शेरेकर यांनी केले आहे. खाजगी मोठया बसेस व खाजगी बसेस यांना खोपोली व वाकण रोडवरच उभ्या करण्यात येणार आहेत. या ठिकाणांहून श्री बल्लाळेश्वर देवस्थान तर्फ गणेश भक्तांची ने-आण करण्यासाठी विक्रम रिक्षांची मोफत सोय करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले तर लहान वाहनांसाठी देवस्थानच्या जागेत व इतर ठिकाणी पार्किंगची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. एस.टी. महामंडळाला नांदगाव मार्गावर धावणाऱ्या अंतर्गत वाहतुकीसाठीची सोय व थांबा या कालावधीत देवळाच्या पलीकडेच ठेवण्यात यावा अशा सुचना देण्यात आल्या आहेत, असे तहसिलदार उत्तम कुंभार यांनी सांगितले.
जिल्ह्यातील महड येथील वरदविनायक अष्टविनायक देवस्थान येथेही माघी गणेशोत्सवाची सध्या जय्यत तयारी सुरु आहे.