

VBA support to Shiv Sena
ठाणे : उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचितकडून निवडून आलेले सुरेखा सोनावणे आणि विकास खरात या दोन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे महापौर बनविण्याचा वाटेवर सेनेने एक पाऊल पुढे टाकल्याचे दिसत आहे.
उल्हासनगर पालिकेतील.७८ जागांपैकी शिवसेना आघाडी ३६ आणि भाजप आघाडीने ३७ जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी ४० जागांची गरज आहे. ह्या जागा वंचित, काँग्रेस आणि अपक्षांच्या मदतीने भरुन निघणार आहे. शिवसेनेने अगोदरच दोन अपक्षांचा पाठिंबा मिळविला आहे. आता वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून पाठिंबा जाहीर केल्याने बहुमताचा जादुई आकडा गाठला गेला आहे.
आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच दलीत वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील कामे करण्यात यावीत यासाठी हा पाठिंबा देत असल्याचे त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि नगरसेवक योगेश जानकर, प्रवक्ते राहुल लोंढे हेदेखील यावेळी उपस्थित होते.