

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतांचा निकाल जरी भाजपच्या फायद्याचा आला असला, तरी जागांच्या गणनेत शिवसेना शिंदे गट आघाडीवर आहे. आतापर्यंत 15 पेक्षा जास्त नगरसेवक स्वबळावर निवडून आणण्यात अपयशी ठरलेल्या भाजपने दुपटीने नगरसेवक निवडून आणत सर्वोच्च कामगिरी केल्याची चर्चा शहरात आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला. उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेने निवडणूक पूर्व कलानी आणि साई पक्ष यांच्याबरोबर युती केली होती.
या शेतीमध्ये पॅनल 12 मधील अपक्ष उमेदवारांनाही समर्थन देण्यात आले होते. तसेच पॅनल 18 मध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्ष याला शिवसेनेने समर्थन दिले होते. भाजपने महापालिकेतील सर्वच्या सर्व 78 जागा लढवल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मतमोजणीत भाजपला संपूर्ण शहरातून एकूण 3 लाख 31 हजार 845 मते मिळाली आहेत. तर शिवसेना शिंदे गट, कलानी गट, अपक्ष आणि साई पक्ष या तिन्ही घटकांना मिळून एकूण 3 लाख 15 हजार 3 मते मिळाली. म्हणजेच मतांच्या बाबतीत भाजपने आघाडी घेतली असून भाजप शिंदे-कलानी-साई आघाडीपेक्षा 16 हजार 842 मतांनी पुढे आहे. मात्र, चित्र पूर्णपणे वेगळे जागांच्या बाबतीत दिसून येते. शिवसेना शिंदे गट आणि कलानी यांना 36, साई पक्ष 1 आणि एक अपक्ष नगरसेवक असे 38 उमेदवार निवडून आणत महापालिकेत सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत. दुसरीकडे भाजपने 37 उमेदवार निवडून आणले असून ते जागांच्या बाबतीत थोडेसे मागे राहिले आहेत. यामुळे उल्हासनगर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी गणिते अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.
मतांच्या टक्केवारीत भाजप पुढे असले तरी नगरसेवकांच्या संख्येत शिवसेना शिंदे गट मित्र पक्षांच्या मदतीने आघाडीवर आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ता कुणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक एक गोष्ट स्पष्ट करते की, मतांमध्ये भाजप मजबूत, पण जागांमध्ये शिवसेना प्रभावी ठरली आहे. याच कारणामुळे उल्हासनगर महापालिकेत स्पष्ट बहुमताअभावी त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.