

नेवाळी : कल्याण लोकसभा क्षेत्रातील श्री मलंगगड फ्युनिक्युलर रोपवेच्या लोकार्पण वरून महायुतीतल्या समन्वयाचा फुगा फुटल्याचे चित्र रविवारी दिसून आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी मिळताच भाजपाने रविवारी ‘मुहूर्त’ साधत परस्पर लोकार्पण करून टाकल्याची चर्चा जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे, हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी बैठका घेतल्या होत्या.
तर लोकसभेतील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या फ्युनिक्युलर संदर्भात शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले जात आहे. मात्र परवानगी येताच नियोजनबद्ध संयुक्त कार्यक्रम करण्याऐवजी भाजपाने एकहाती कार्यक्रम उरकून टाकल्याने शिंदे सेनेच्या गोटात नाराजीचा सूर ऐकू येतो आहे.
कल्याण लोकसभेतील कल्याण पूर्व विधानसभेत तत्कालीन आमदार किसन कथोरे असताना त्यांनी हा प्रकल्प श्री मलंगगडावर आणला होता. मात्र प्रत्यक्षात प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मोठा अवधी जात असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. शिंदेनी, पालकमंत्री एकनाथ शिंदेनी बैठका घेऊन कामाच्या सुरु असलेल्या स्थितीचा आढावा अनेकदा घेता होता. मात्र शिवसेनेला अंधारात ठेवून भाजपाने केलेला लोकार्पण चर्चेत आला आहे.
लोकार्पण सोहळ्याला शिंदे सेनेचे कोणतेही प्रमुख पदाधिकारी दिसले नाहीत, एवढंच नाही तर स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचीही अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.
‘महायुतीत मित्रपक्षाला विश्वासात घेऊन कार्यक्रम व्हायला हवा होता, पण इथे मात्र शिवसेनेला अंधारात ठेवून श्रेय लाटण्याचा प्रयत्न झाला,’ अशी दबक्या आवाजात चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. शिवसेनेकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, यात्रेआधी घाईघाईत केलेलं लोकार्पण आणि नियोजनातील एकतर्फीपणा यामुळे नाराजी वाढत असल्याचं संकेत मिळत आहेत.
‘विकासकामाचं श्रेय सर्वांचं असतं,पण इथे मात्र श्रेयासाठी मित्रपक्षालाच बाजूला सारलं, अशी भावना शिंदे सेनेच्या स्थानिक गोटातून व्यक्त होत असल्याचं चित्र आहे.