Kalyan National Highway work stalled
डोंबिवली : कल्याण-मुरबाड-माळशेज रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग २२२ म्हणून ओळखला जातो. ठाणे-मुंबई-कल्याणहून माळशेज घाटाकडे जाण्यासाठी महत्त्वाचा, निसर्गरम्य पण डोंगराळ, वळणांचा रस्ता आहे, ज्यावर सध्या चौपदरीकरण व मजबुतीकरणाचे काम चालू आहे, ज्यामुळे वाहतूक हळू चालते. अपघातांपासून बचावासाठी वाहनचालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, तसेच या मार्गाचा विस्तार रेल्वेमार्गासाठीही प्रस्तावित आहे.
मात्र, या साऱ्या वल्गना ठरल्या आहेत. मोरोशी ते टोकावडे दरम्यान रस्त्यावर ठेकेदाराकडून जणू काही नांगरट केली आहे. दोन्ही बाजूंनी रस्ता खोदून ठेकेदाराने पळ काढल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी या महामार्गाचे काम पूर्णतः ठप्प झाल्याने शासन/प्रशासनातील संबंधित खात्याचे अधिकारी, ठेकेदार आणि या सर्वांवर अंकुश ठेवण्यात कसूरी करणाऱ्या नेत्या-पुढाऱ्यांच्या नावाने वाहतूकदार, प्रवासी, वाहनचालक आणि रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या ग्रामस्थांकडून लाखोली वाहिली जात आहे.
कल्याण-मुरबाड-माळशेज हा महामार्ग सह्याद्रीच्या रांगेतून जातो. पावसाळ्यात धबधबे, हिरवीगार वनराई आणि धुक्यामुळे हा मार्ग पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरतो. मुंबई, पुणे, नाशिक व मराठवाड्यासह विदर्भातील लोकांसाठी हा सोयीचा मार्ग आहे. वया रस्त्याचे चौपदरीकरण (Four-laning) आणि मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. हा रस्ता ठिकठिकाणी खोदलेला दिसतो. काम चालू असल्यामुळे अपघात टाळण्यासाठी जेसीबी आणि इतर साहित्य तैनात ठेवले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले जाते. डोंगराळ रस्ता, तीव्र चढ-उतार आणि नागमोडी वळणे असल्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवावे. रस्त्याच्या कामामुळे वाहतूक मंदावते, त्यामुळे पुरेसा वेळ घेऊन प्रवास करावा. विशेषतः पावसाळ्यात आणि धुक्यात प्रवास करताना जास्त काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात येत असते.
कल्याण-मुरबाड काँक्रीट रस्त्याच्या कामासाठी ९८४ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याप्रमाणे ठिकठिकाणी कामे सुरू करण्यात आली होती. या रस्त्यामुळे कल्याण-मुरबाड-नगर परिसराच्या विकासाला वेग येईल, असा विश्वास वाटत होता. मात्र, या विश्वासाला तडा गेला आहे. कल्याणकडे प्रवास करत असताना मुरबाड तालुक्याची हद्द संपताच चालकांना वाहन चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी चालकास फक्त ३० ते ३५ मिनिटे लागत होते.
मात्र, मुरबाड-कल्याण हे २७ किलो मिटरचे अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तास लागत आहेत. मुरबाडची हद्द संपताच वाहान चालकांना आपली वाहने खड्डे पडून चाळण झालेल्या रस्त्यावरून चालवावी लागत असल्याने चालक आणि वाहनातील प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. दुचाकीस्वार तर संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत. कल्याण-मुरबाड हा रस्ता चौपदरी होणार असल्याने संबंधीत खाते या रस्त्याची दुरूस्ती देखील करत नसल्याने माणसांबरोबर वाहने देखिल पडू लागली आहेत. रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना अनेक दुचाकीस्वारांचे अपघात होऊ लागले आहेत.
मुरबाड तालुक्यातील आजारी रूग्ण, गर्भवती महिला, गंभीर आजाराने ग्रासलेले रूग्ण वा माळशेज घाट परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांतील जखमींना तातडीने उपचारासाठी उल्हासनगर, कल्याण, कळवा किंवा मुंबईकडे न्यावे लागत असल्याने रूग्णवाहिकांनाही या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाल्याने रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
माळशेज घाटमार्गे कल्याणसह नवीमुंबई (वाशी), मुंबई येथील मार्केटमध्ये भाजीपाला, दूध, कोंबडीची वाहातूक करणारी शेकडो वहाने या रस्त्यावरून ये-जा करत असतात. या वाहनांचे चालक आपला माल वेळीच मार्केटमध्ये पोहचविण्यासाठी खड्डे चुकवत, तसेच भरधाव वेगाने नागमोडी चालवत असल्याने अपघाताच्या घटना घडत असतात. शिवाय याच रस्त्याने ये-जा करणारे चाकरमानी आपला जीव मुठीत धरून कामावर जाताना दिसून येत आहेत.
माळशेज घाट उतरल्यावर मोरोशी ते टोकावडेपर्यंत १५.५ किमी अंतराचा रस्ता सलग उखडून टाकला आहे. अवघ्या२९ मिनिटांचा हा रस्ता पार करण्यासाठी सद्या ३ तास खर्च करावे लागत आहे. या रस्त्याला जागोजागी नांगरट केल्यासारखे खोदकाम करून ठेकेदार प्रसार झाल्याचे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या चाकरमानी, वाहतूकदार आणि प्रवाशांनी सांगितले. टोकावडे गावापासून माळशेज घाटापर्यंत १८ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी अवघे ३८ मिनिटे लागतात. मात्र हा रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवला आहे.
वास्तविक पाहता रस्ते बांधताना एक बाजू वाहतुकीसाठी सुस्थितीत असली पाहिजे. मात्र दोन्ही बाजूंना खोदकाम करून ठेकेदार निघून गेल्याचे हातावर पोट भरणाऱ्या मजुरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. उखडून टाकलेल्या रस्त्यावर पसरलेल्या अनुकूचीदार लहान-सहान दगडांवरून दुचाक्या चालविणे जिकिरीचे झाले आहे. शॉकॲब्झॉरवर आणि टायर्सवर परिणाम होऊन वाहने, विशेषतः दुचाक्या नादुरूस्त होत आहेत. कंबर, माकडहाड, मणके, हाडे खिळखिळी होऊन प्रवाशांसह वाहनचालकांना निरनिराळे आजार जडू लागले आहेत. त्यातच मातीचा उडणारा धुरळा देखिल आजारांना आमंत्रण देत असतो. धडधाकट माणसाला देखिल श्वसनाचे आजार जडू लागले आहेत. या साऱ्याला जबाबदार कोण ? असा सवाल प्रवासी, वाहतूकदार, वाहनचालकांसह रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
कल्याणपासून मुरबाड, सरळगाव, टोकावडे ते अगदी माळशेज घाटापर्यंत जागोजागी राजकीय पक्षांच्या नेत्या/पुढाऱ्यांचे लहान-मोठे बॅनर्स आणि होर्डींग्ज लागले आहेत. आपल्या आवडत्या नेत्या/पुढाऱ्यांना शुभेच्या देणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी असे बॅनर्स/होर्डींग्ज उभारले आहेत. अशा नेत्या/पुढाऱ्यांचे बॅनर्स/होर्डींग्जवरील फोटो उपरोधिकपणे शुभेच्छांना प्रतिसाद देताना दिसत असल्याच्या प्रतिक्रिया त्रस्त प्रवासी, वाहतूकदार आणि वाहनचालकांसह ग्रामस्थांकडून उमटत आहेत. यापेक्षाही कहर म्हणजे याच रस्त्याने दररोज शेकडो नेते, पुढारी, लोकप्रतिनिधी, शासन/प्रशासनाचे अधिकारी ये-जा करत असतात. ही मंडळी डोळ्यांना पट्टी बांधून प्रवास करतात का ? सर्वसामान्यांच्या वेदना अशा लोकांना जाणवत नाहीत का ? आदी प्रश्नांची सरबत्ती करण्यात येत आहे.
पाच दशकांहून अधिक वर्षांपासून रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. उल्हासनगरमार्गे मुरबाडपर्यंत रेल्वे धावणार आहे. या मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने ७२६ कोटी ४५ लाख रूपये मंजूर केले आहेत. लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे, अशा वल्गना करणाऱ्या नेत्या/पुढाऱ्यांनी आधी आहे तोच रस्ता सुस्थितीत आणि किमान वेळेत करून दाखवावा, त्यानंतर या भागातील ग्रामस्थांना रेल्वेची स्वप्ने दाखवावीत. अन्यथा एके दिवशी संतापाचा कडेलोट होण्याची शक्यता या रस्त्याने या-जा करणाऱ्या प्रवाशांसह चाकरमानी, वाहनचालक, वाहतूकदार आणि रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.