

Ambivli young man stabbed
डोंबिवली : यापुढे तुमच्या पार्टीत सहभागी होणार नाही आणि दारू देखील नाही...हे शब्द झोंबल्याने चार जणांच्या टोळक्याने उल्हासनगरच्या एका गॅस सिलिंडर डिलिव्हर बॉयच्या डोक्यात चाकू खुपसून त्याला जबर जखमी केले. मित्राने अशा शब्दांत अवहेलना केल्याने संतापलेल्या चौकडीने शिवीगाळ करत त्याला ठोसा-बुक्क्याने बेदम मारहाण केली. हा प्रकार कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या वडवली गावात घडला.
या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या डिलिव्हरी बॉयने दिलेल्या फिर्यादीनुसार खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून हल्लेखोर चौकडीचा शोध सुरू केला आहे. आकाश सिंग ( वय २६) असे जखमी डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. तो उल्हासनगर क्रमांक चार परिसरात आपल्या कुटुंबीयांसह राहतो.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार आकाश सिंग हा उल्हासनगरमधील साईकृपा गॅस एजन्सीत गॅस सिलिंडर वितरणाचे काम करतो. आकाश सिंग हा गॅस सिलिंडर वितरणाचे ग्राहकांकडील पैसे जमा करण्यासाठी आंबिवली पश्चिमेकडील अटाळी गावात आला होता. तेथील वडवलीमध्ये असलेल्या हनुमान मंदिर रस्त्याने जात असताना अचानक आकाशला त्याचे जुने मित्र सागर सुरडकर उर्फ पिकाच्चू (रा. रमाबाई नगर, उल्हासनगर), रूपेश ओवाळे, सिध्दार्थ, म्हारी असे चौघे भेटले.
यापूर्वी हे सर्व जण मिळून ओली पार्टी करत असत. त्यामुळे आकाश भेटल्याची संधी साधून या चौकडीने आजही आपण कुठे तरी बसून दारू पिऊ, अशी गळ घातली. मात्र आकाशने इन्कार केला. यापुढे तुमच्या सोबत दारू पिण्यासाठी येणार तर नाहीच, शिवाय दारू देखील पिणार नाही. त्यामुळे तुमचा निर्णय तुम्हीच घ्या, असे बोलला. हे ऐकून सागर सुरडकर याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने कमरेला खोचलेला धारदार चाकू काढून आकाशवर वार केले. हल्लेखोर सागरच्या अन्य साथीदारांनी देखिल आकाशला पकडून ठोसा-बुक्क्यांनी मारहाण केली. आकाशच्या डोक्यात चाकू घुसल्याने तो रक्तबंबाळ झाला. आकाश गंभीर जखमी झाल्याचे पाहून हल्लेखोर चौकडीने तेथून पळ काढला.
आकाशने ही माहिती मोबाईलद्वारे आपल्या आईला दिली. आईसह इतर नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. खडकपाडा पोलिसांना ही माहिती देण्यात आली. जखमी आकाशला पोलिसांनी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी पाठविले. उपचार घेऊन परतल्यानंतर आकाशने पोलिसांना घडलेला प्रसंग सांगितला.
त्यानंतर आकाश यांच्या तक्रारीवरून सागर, रूपेश, सिध्दार्थ आणि म्हारी या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हल्लेखोर चौकडी उल्हासनगरातून अटाळीत कशासाठी आले होते ? हल्लेखोर चौकडीचा इरादा संशयास्पद असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्या अटकेनंतर सारा प्रकार उघडकीस येणार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.