

डोंबिवली : कल्याणच्या पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या वालधुनी उड्डाणपूलाच्या डांबरीकरण आणि दुरुस्तीचे काम करण्यासाठी उद्या २० डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून पुढील २० दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी याबाबत अधिसूचना काढून ही माहिती दिली आहे. तर शाळांना असणारी नाताळची सुट्टी लक्षात घेऊन त्यादृष्टीने या पुलाच्या दुरुस्तीचे नियोजन करण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यात आधी कल्याण-मुरबाड मार्गावरील शहाड उड्डाणपूल आणि त्यानंतर एफ केबिन रोड परिसरातील उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यापाठोपाठ आता या कल्याणातील तिसऱ्या महत्त्वाच्या उड्डाणपुलाची दुरुस्ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून केली जाणार आहे. कल्याण पुर्व-पश्चिम जोडणाऱ्या वालधुनी उड्डाणपुलाचे (सुभाषचंद्र बोस) डांबरीकरणाचे आणि बेअरिंग रिप्लेसमेंट एक्सपांशन जॉईंटचे काम करण्यात येणार आहे.
हे काम २० डिसेंबर ते १० जानेवारी २०२६ रोजी पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत पुढील बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. ही नियंत्रण अधिसुचना दिनांक २० जानेवारी रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते दिनांक १० जानेवारी २०२६ पर्यंत रात्रौ १२ वाजेपर्यंत अंमलात राहणार असून ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही.
प्रवेश बंद - १) कल्याण पुर्वेकडून स्व. आनंद दिघे ब्रिज वरून कल्याण पश्चिम कडे वालधुनी ब्रिज मार्गे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सम्राट चौक (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने सम्राट चौक (डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक) येथे उजवे वळण घेवुन पुढे शांतीनगर उल्हासनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद - २) उल्हासनगर शहरातून सम्राट चौक मार्गे, वालधुनी ब्रिजवरून कल्याण पश्चिमकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सम्म्राट चौक (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने सम्राट चौक (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) येथे डावीकडे वळण घेवून पुढे स्व. आनंद दिघे ब्रिज वरून इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद - ३) कल्याण पश्चिम वालधुनी ब्रिज वरून सम्राट चौक मार्गे उल्हानगर व स्व. आनंद दिघे ब्रिज वरून कल्याण पुर्वेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सुभाष चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग - सदरची वाहने सुभाष चौक येथुन सरळ पुढे, कर्णिक रोड, प्रेम ऑटो येथे उजवीकडे वळण घेवून शहाड ब्रिज मार्गे इच्छित स्थळी जातील.