Student death Pudhari
ठाणे

Kalyan Crime: 'आई-बाबा...माझ्या जाण्याचा त्रास करून घेऊ नका…’, कल्याणात बारावीच्या विद्यार्थीनीने संपवले जीवन

बारावीच्या परीक्षेत आपल्याला अपयश येईल, आपण उत्तीर्ण होणार नाही, या मानसिक तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : बारावीच्या परीक्षेत अपयश येईल या भीतीपोटी 17 वर्षांच्या तरुणीने राहत्या घरी जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना कल्याणमध्ये घडली. 'आई-बाबा, मी गेल्यावर त्रास घेऊ नका...'अशी चिठ्ठीही त्या मुलीने आयुष्य संपवण्यापूर्वी लिहून ठेवली होती.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १७ वर्षीय महाविद्यालयीन तरूणी बुधवारी सकाळी राहत्या घरातील पोटमाळ्यावर गळफास घेतलेल्या स्थितीत लटकताना आढळून आली. शेजाऱ्यांच्या मदतीने घरच्यांनी गळफास सोडवून उतरवल्यानंतर तत्काळ तिला रूग्णालयात दाखल केले. तथापी तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या घरच्यांसह परिसरात शोककळा पसरली आहे.

विद्यार्थिनी एका नामांकित महाविद्यालयात बारावी कॉमर्समध्ये शिक्षण घेत होती. सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत आपल्याला अपयश येईल, आपण उत्तीर्ण होणार नाही, या मानसिक तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी या तरूणीने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीमध्ये तिने आपल्या मनातील भीती आणि पालकांविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी गेल्यावर आई-बाबा त्रास करून घेऊ नका...असा मजकूर असलेल्या या चिठ्ठीमुळे परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांवर असलेल्या मानसिक दबावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

काही दिवसांपूर्वीच तिसगांव नाक्यावरील सहजिवन सोसायटीत राहणाऱ्या ३० वर्षीय आयेश विश्वनाथ अमीन या बँकेत नोकरी करणाऱ्या तरूणाला कुत्रा चावल्यानंतर आपल्याला रेबीज होईल, या भीतीने त्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर आता ही घटना घडली आहे.

अशा परिस्थितीत संवाद साधावा

 मुलांनी आपल्या मनातील भीती, ताण किंवा समस्या आई-बाबांशी मोकळेपणाने शेअर केली पाहिजे. घरात प्रेमाचे वातावरण ठेवावे. मुलांच्या उलट बोलण्यामुळे आई-वडील दुखावले जातात, त्यामुळे शांततेने चर्चा करावी. जर परिस्थिती हाताबाहेर जात असेल (उदा. कौटुंबिक हिंसाचार, मानसिक ताण-तणाव), तर जवळचे नातेवाईक, मित्र किंवा समुपदेशकाची (Counselor) मदत घ्यावी, असे आवाहन मानसोपचारतज्ज्ञांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT