

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील गजबजलेल्या महालक्ष्मी हॉटेल परिसरात रविवारी (दि. २२) सकाळी एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेला जाळण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन परिसरात इमारतींच्या सांडपाण्याचा एक मोठा नाला आहे. या नाल्याचा परिसर कचऱ्याने आणि पत्र्यांनी वेढलेला आहे. रविवारी सकाळी परिसरातून जाणाऱ्या पादचाऱ्यांना नाल्यातून उग्र दर्प येऊ लागल्याने त्यांनी खाली वाकून पाहिले. तेव्हा सुमारे १२ ते १५ फूट खोल नाल्यात एका महिलेचा जळालेला मृतदेह दिसून आला. नागरिकांनी तातडीने याची माहिती महात्मा फुले चौक (एमएफसी) पोलिसांना दिली.
घटनेची गांभीर्य ओळखून पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह नाल्यातून बाहेर काढला. प्राथमिक तपासानुसार, अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास या महिलेला नाल्यात ढकलून, तिच्यावर ज्वालाग्राही पदार्थ टाकून पेटवून दिले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हा घातपाताचा प्रकार असून पुरावा नष्ट करण्यासाठी हे कृत्य केल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे.
ही महिला बेवारस किंवा फिरस्ती असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, हा मृत्यू घातपाताने झाला की आत्महत्या आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील दुकाने आणि इतर आस्थापनांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. तसेच परिसरातील नागरिकांची आणि तिथे वास्तव्य करणाऱ्या इतर फिरस्त्यांचीही चौकशी सुरू केली आहे.
महिलेची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि वेळ स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. एमएफसी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास अत्यंत वेगाने करत आहेत.