Kalyan Crime : कल्याणमध्ये भर रस्त्यात दोन गटांत तुंबळ हाणामारी, सोडवायला गेलेल्या पोलिसाची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

कल्याण पूर्वेतील शंभर फुटी रस्त्यावर दीड तास 'ट्रॅफिक जाम'
Kalyan Crime
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील शंभर फुटी रस्त्यावर गुरुवारी (दि. १९) दोन गटांमध्ये तुंबळ राडा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छेड काढल्याच्या संशयावरून सुरू झालेल्या या वादाचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाले. या वादाची सोडवणूक करताना एका पोलीस कर्मचाऱ्याचा रक्तदाब (बीपी) अचानक वाढल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली अल्पवयीन मुलांसह त्यांना मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वादाची ठिणगी कशी पडली?

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील गजबजलेल्या शंभर फुटी रस्त्यावरून एक महिला आपल्या नातेवाईकासह दुचाकीवरून जात होती. यावेळी पाठीमागून येणाऱ्या दोन अल्पवयीन दुचाकीस्वारांनी त्यांच्या गाडीला 'कट' मारल्याचा आरोप करण्यात आला. या किरकोळ वादाचे रूपांतर अल्पावधीतच गंभीर छेडछाडीच्या आरोपात झाले. या महिलेने फोन करून आपल्या ओळखीच्या लोकांना घटनास्थळी बोलावून घेतले, तर दुसरीकडे अल्पवयीन मुलांनीही आपल्या साथीदारांना बोलावले.

शंभर फुटी रस्त्यावर दीड तास 'ट्रॅफिक जाम'

दोन्ही बाजूंचे समर्थक आमनेसामने आल्याने शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आणि त्याचे रूपांतर पाहता पाहता लाथाबुक्क्यांच्या हाणामारीत झाले. भररस्त्यात सुरू असलेल्या या राड्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. सुमारे दीड तास या मार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या गदारोळात एका तरुणाची सोन्याची साखळी हिसकावून घेतल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

कर्तव्यावर असलेल्या पोलिसाची प्रकृती खालावली

घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त जमावाला पांगवताना आणि राडा सोडवताना एका पोलीस कर्मचाऱ्याला प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण सहन करावा लागला. यामुळे त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून गुन्हे दाखल

याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी चक्रावून टाकणारी कायदेशीर कारवाई केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलांविरुद्ध छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे संबंधित मुलांच्या तक्रारीवरून त्यांना बेदम मारहाण करणाऱ्या महिलेच्या सहका-यांविरुद्धही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

'राडेबाजांवर' जरब बसणार का? नागरिकांचा सवाल

या घटनेमुळे कल्याणकर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ‘जर मुलांनी काही चुकीचे कृत्य केले असेल, तर कायदा त्यांना शिक्षा देण्यास समर्थ आहे. मात्र, अशा प्रकारे कायद्याला हातात घेऊन भररस्त्यात हैदोस घालणे, पोलिसांना वेठीस धरणे आणि वाहतूक कोंडी करणे हे कितपत योग्य आहे?’ असा संतप्त सवाल घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी विचारला आहे. आता या 'राडेबाजांवर' पोलीस प्रशासन काय कठोर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news