विकासकामांना ब्रेक 
ठाणे

ठाणे शहराला मिळणार ७० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

अनुराधा कोरवी

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा व्हावा यासाठी भातसा आणि बारवी धरणातून ५० दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेच्या कोटय़ातील २० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये घेतला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे ठाणे शहराची पाण्याची समस्या बऱ्याच अंशी कमी होणार आहे. विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेकडून मिळणारे पाणी हे प्रक्रिया करूनच मिळणार असल्याने यासाठी लागणारा ठाणे महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्च यामुळे वाचणार आहे.

सह्याद्री अतिथीगृहात ठाणे जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज ४८५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणीपुरवठा कमी पडतो. हे लक्षात घेऊन बारवी आणि भातसा धरणांतून प्रत्येकी ५० दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. बारवी धरणाची उंची वाढविल्यानंतर या धरणातून शहराला१०० दशलक्ष लिटर पाणी मिळावे, असा आग्रह महापालिका प्रशासनाने धरला होता. जलसंपदा विभागाने अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध करून देण्यासाठी पुढील कार्यवाही तात्काळ करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात झपाट्याने नागरिकरण झाले असून, शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या आसपास आहे. महापालिका क्षेत्रामध्ये चार स्त्रोतांमार्फत दररोज ४८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु, वा़ढत्या नागरिकरणामुळे शहरात अनेकठिकाणी पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने वाढीव पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. असे असतानाच ठाणे शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन ठाणे शहराला मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीद्वारे अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र, शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये ठाणे शहराची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने ७० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी देण्याचा निर्णय घेऊन ठाणे शहराला मोठा दिलासा दिला आहे.

ठाणे महापालिकेबरोबरच कल्याण- डोंबिवली, मिरा भाईंदर, उल्हासनगर मनपा क्षेत्रात आणि जिल्ह्याच्या उर्वरित भागाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत जलसंपदा एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. भातसा, नामपाडा, पोवाले, काळू आणि शाई या धरणांच्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्यासोबतच या धरणांच्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT