

नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभे शुक्रवारी पिण्याच्या पाण्यावरून चांगलेच रणकंदन झाले. कल्याण रोड, शिवाजीनगर भागात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकार्यांना काळे फासण्यात येईल, असा इशारा नगरसेवकांनी दिला. तर, 'फेज टू', 'अमृत' योजना कधी कार्यान्वित होणार, असा सवाल उपस्थित करून सभापती कुमार वाळके यांच्यासह नगरसेवकांनी अधिकार्यांना धारेवर धरले.
महापालिका स्थायी समितीची सभा शुक्रवारी सभापती कुमार वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात नगरसेवक मुद्दसर शेख, रवींद्र बारस्कर, विनीत पाऊलबुद्धे, सचिन शिंदे तर, उपायुक्त यशवंत डांगे, सचिन राऊत, श्रीनिवास कुर्हे, शहर अभियंता सुरेश इथापे, जल अभियंता परिमल निकम, आर. जी. सातपुते आदी उपस्थित होते.
सावेडी गावालगत असलेल्या एनसीसी कार्यालयाच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स प्रास्तावित असून, ती जागा अद्यापपर्यंत खाली का झाली नाही, असा प्रश्न सभापती वाकळे यांनी विचारला. त्यावर अधिकार्यांनी सांगितले की, संबंधित कार्यालयाला नोटीस दिली असून, जागा खाली करण्यास एक महिन्यांची मुदत दिली आहे. त्यांनी पर्यायी जागेची मागणी केली आहे.
त्यावर सभापती वाकळे म्हणाले, की पर्यायी जागा देण्याची जबाबदारी आपली नाही. प्रशासनान तत्काळ शॉपिंग सेंटर उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना केल्या. नगरसेवक रवींद्र बारस्कर म्हणाले, मनपा प्रशासनाकडून जागा खाली करण्यासंदर्भात अत्यंत विलंबाने कार्यवाही सुरू आहे. लवकरात लवकर ही कार्यवाही पूर्ण होणे आवश्यक आहे.
पाणीप्रश्नांवर सदस्यांनी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. तत्कालीन महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या काळात 'फेज टू', 'अमृत' योजनेला गती मिळाली होती. 'अमृत' चे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित कामाला मनपा प्रशासनाला वेळ मिळेना. 'फेज टू' योजनेंतर्गत शहरात सर्वत्र पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत.
मात्र, त्यात पाण्याचा ठिपूसही नाही. मनपा प्रशासन लोकांना किती दिवस वेड्यात काढले काढणार असा सवाल उपस्थित केला. यावर अधिकारी थातूरमातूर उत्तरे दिली. कल्याण रोडवरील शिवाजीनगर भागात 365 दिवसांपैकी 45 दिवस पाणी येते. आम्हाला पूर्ण दाबाने पाणी मिळणार नाही, तोपर्यंत पाणी व घरपट्टी भरणार नाही, असा इशारा नगरसेवक सचिन शिंदे यांनी दिला. यावेळी सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
उपायुक्त पडले तोंडघशी
पाणी पट्टी, घरपट्टी भरणार्या भागातही पाण्याची बोंबाबोंब आहे. सावेडी प्रभाग करवसुलीत शहरात प्रथम क्रमांकावर आहे. त्यावेळी मनपा उपायुक्त डांगे यांनी प्रभाग चार करवसुलीत प्रथम असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर कर्मचार्याने उठून सांगितले की, सावेडी प्रभाग वसुलीमध्ये प्रथम आहे. त्यामुळे खुद्द उपायुक्तांच कोणत्या भागात वसुली जास्त आहे, हे माहीत नसल्याचे स्पष्ट झाले.
संबंधितांचा खुलासा मागविला
बंदोबस्त न घेता कारवाई करणे चुकीचे आहे. याबाबत पोलिस ठाण्यात कामगार युनियनशी चर्चा केली होती. त्यानंतरही अचानकपणे काम बंद आंदोलन करण्यात आले. हे चुकीचे आहे. त्यातून काहीच साध्य झाले नाही. उलट जास्तीचा पोलिस बंदोबस्त घेऊन मोठी कारवाई करणे आवश्यक होते. विनाकारण काम बंद आंदोलन केल्याप्रकरणी त्या दिवसांचा कर्मचार्यांचा पगार थांबविण्याचे आदेश दिले आहेत, तसेच बंदोबस्त न घेता कारवाई का? केली यासंदर्भात खुलासा मागविण्यात येईल, असे उपायुक्त यशवंत डांगे म्हणाले.
विना बंदोबस्तात कारवाई का?
शहरातील बाबा बंगाली परिसरात अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक झाली. पथक विना पोलिस बंदोबस्त पथक कारवाईसाठी का गेेले, असा सवाल नगरसेवक मुद्दसर शेख यांनी उपस्थित केला. तर, त्या घडलेल्या घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्न नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे यांनी केला.