नाशिक : कोंबडीचोर असल्याच्या संशयावरून इतकं मारलं की, तो मेलाच | पुढारी

नाशिक : कोंबडीचोर असल्याच्या संशयावरून इतकं मारलं की, तो मेलाच

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
हॉटेल मधील कोंबड्या आपल्याच मजुराने चोरल्याच्या संशयावरून हॉटेल मालकाने आपल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मजुराला पायातील बुट व लाथा बुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत त्या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना येवला तालुक्यात घडली आहे. मयताच्या मुलांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्जुन बाळु नळे रा. डोंगरगाव ता. येवला या मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल मालक शेख जमीर महेबुब  (३८)  रा. भारम ता. येवला याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बाळू गणपत नळे (४९) रा. डोंगरगाव ता. येवला हे येवला तालुक्यातील भारम येथे हॉटेल मध्ये मजुरीचे काम करीत होते. 3 जुलै 2022 रोजी हॉटेलचे मालक शेख जमीर याने हॉटेलमधील कर्मचारी असलेल्या वाळू नळे यास कोंबड्या चोरुन विक्री केल्याच्या संशयावरुन मारहाण केली. लाथेने तोंडावर, छातीवर, पोटावर, पाठीवर, तसेच पायांवर मारहाण करीत गंभीर दुखापत केली. या घटनेत त्यांची तब्येत इतकी खालावली की, त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.

उपचारादरम्यान काल (दि. 15) रोजी वाळू नळे यांचा मृत्यू झाला. हॉटेलमालक शेख जमीर याच्याविरोधात येवला तालुका पोलीस ठाण्यामध्ये भादवी 302 अंतर्गत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित हॉटेलमालकास तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वल सिंग राजपूत करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button