धुळे शिवसेना जिल्हाप्रमुखपदी अतुल सोनवणे यांची नियुक्ती ; गावित यांना हटविले | पुढारी

धुळे शिवसेना जिल्हाप्रमुखपदी अतुल सोनवणे यांची नियुक्ती ; गावित यांना हटविले

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मदत करणाऱ्या साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांचे पती डॉ. तुळशीराम गावित यांना धुळ्याच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे. धुळ्याच्या जिल्हाप्रमुख पदावर आता अतुल सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना सोनवणे यांनी काळ संघर्षाचा असला तरीही सर्व शिवसैनिकांची मोट बांधून पक्ष संघटन करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात सत्तांतराचे नाट्य घडत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभेच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी पाठिंबा दिला. त्याचे पडसाद आता उमटले आहे. धुळ्याच्या जिल्हाप्रमुख पदावर डॉक्टर तुळशीराम गावित यांची गेल्या वर्षीच नियुक्ती करण्यात आली होती. मात्र डॉक्टर गावित यांनी देखील शिंदे गटाला समर्थन दिल्यामुळे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. आज जिल्हाप्रमुख पदावरून डॉक्टर गावित यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

ही निवड जाहीर होताच धुळे येथील शिवसेना भवनामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. महानगर प्रमुख मनोज मोरे यांच्यासह किरण जोंधळे, भरत मोरे, विनोद जगताप, उपजिल्हाप्रमुख धीरज पाटील तसेच ललित माळी, अॅड. राजू गुजर यांच्यासह अनेकांनी त्यांचा सत्कार केला. या निवडी संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना अतुल सोनवणे यांनी सांगितले की, माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला तिसऱ्या वेळेस शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर काम करण्याची संधी पक्ष श्रेष्टी यांनी दिली आहे. सध्या राज्यात संघर्षाचा काळ सुरू आहे. मात्र अशा परिस्थितीतही धुळे जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन पक्ष संघटन आणखी मजबूत करण्याचे काम केले जाणार असल्याचे सोनवणे म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button