IVF Pudhari
ठाणे

Badlapur IVF Racket: बदलापूरमध्ये बेकायदेशीर अंडबीज विक्री रॅकेट उघड; आयव्हीएफ केंद्रे पोलिसांच्या रडारवर

गरीब महिलांना आमिष दाखवून अंडसंकलन; ठाणे पोलिसांची धडक कारवाई, अनेक राज्यांपर्यंत तपासाचा विस्तार

पुढारी वृत्तसेवा

बदलापूर : पंकज साताळकर

बदलापूर पूर्वेकडील मुवेली येथील नॅनी सिटी गृहसंकुलात सुरू असलेल्या बेकायदेशीर अंडबीज विक्री प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. अनेक डॉक्टर, हॉस्पिटल्स आणि मध्यस्थांच्या मदतीने हे रॅकेट सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तपासाचा भाग म्हणून पोलीस गोपनीयता पाळत असले तरी अनेक आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटर पोलिसांच्या रडारवर असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विशेषतः कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांत अंडबीजांची तस्करी होत असल्याचा संशय असून, त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही टोळी गरीब आणि गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वारंवार अंडबीज काढून घेत असे. पीडित महिलांना प्रत्येक सायकलसाठी २५ ते ३० हजार रुपये दिले जात होते. अंडउत्पादन वाढवण्यासाठी त्यांना हार्मोनल इंजेक्शने दिली जात होती. त्यानंतर संबंधित महिलांना आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवून शस्त्रक्रियेच्या माध्यमातून अंडबीज काढली जात होती.

आतापर्यंत २० हून अधिक महिला या रॅकेटच्या बळी ठरल्याची माहिती आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाने या संदर्भात तीन वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती केली असून आरोग्य विभागाच्या मदतीने विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. या कारवाईत दहा लाख रुपयांहून अधिक किमतीची इंजेक्शने आणि संशयास्पद औषधे जप्त करण्यात आली आहेत. उल्हासनगर विभागाचे डीसीपी सबिन गोरे यांनी ही माहिती दिली. सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा चालखेडे या तीन महिलांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून २७ फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

आयव्हीएफ सेंटरचा नवा गोरखधंदा?

आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) प्रक्रियेमध्ये ज्या महिलांना गर्भधारणेत अडचणी येतात, त्यांना हार्मोनल इंजेक्शने देऊन अंडांची वाढ केली जाते. त्यानंतर अंडे काढून प्रयोगशाळेत फलन प्रक्रिया केली जाते आणि तयार भ्रूण पुन्हा महिलेच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जातो. अनेक दांपत्ये डॉक्टरांवर विश्वास ठेवून लाखो रुपये खर्च करून ही प्रक्रिया करतात.

मात्र जर बाहेरून मिळवलेली अंडबीज वापरून फसवणूक होत असेल, तर हे संबंधित हॉस्पिटल्सकडून दांपत्यांची गंभीर नैतिक फसवणूक ठरू शकते. पोलिसांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतली असून संबंधित आयव्हीएफ केंद्रांची नावे समोर आल्यानंतर यापूर्वी उपचार घेतलेल्या दांपत्यांमध्येही संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. भविष्यात नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

तपासात गुप्तता

अंडबीज विक्री प्रक्रियेत केवळ इंजेक्शन देणे एवढेच काम नसून, सोनोग्राफी, अंडसंकलन, त्याचे संरक्षण आणि दुसऱ्या महिलेमध्ये प्रत्यारोपण करण्यासाठी आयव्हीएफ केंद्रातील यंत्रणा वापरली जाते. ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही मोठी हॉस्पिटल्स आणि परराज्यातील केंद्रांचाही सहभाग असण्याची शक्यता तपासात आहे. काही डॉक्टर, हॉस्पिटल्स आणि मध्यस्थांच्या मदतीने हे रॅकेट सुरू असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

प्रजनन प्रक्रियेतील महत्त्व

अंडबीजदान ही एक संवेदनशील प्रजनन प्रक्रिया आहे. यात एका स्त्रीकडून अंडबीज घेऊन दुसऱ्या व्यक्तीला गर्भधारणा होण्यासाठी मदत केली जाते. ही प्रक्रिया सहसा आयव्हीएफद्वारे केली जाते. यामध्ये वैद्यकीय तपासणी, हार्मोन उपचार, अंडसंकलन, फलन आणि भ्रूण हस्तांतरण या टप्प्यांचा समावेश असतो. ही प्रक्रिया केवळ नोंदणीकृत आणि अधिकृत केंद्रातच वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्हायला हवी.

महिलांचे आरोग्य खरंच सुरक्षित आहे का?

डोंबिवली : संस्कृती शेलार

महिलांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पैशांच्या लालसेपोटी महिलांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याच्या या प्रकरणामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

माहितीनुसार, बदलापूर पूर्व परिसरात काही महिलांना पैशांचे आमिष दाखवून हार्मोनल इंजेक्शने देण्यात येत होती आणि कृत्रिमरीत्या अंडांची वाढ केली जात होती. त्यानंतर शस्त्रक्रियेच्या माध्यमातून अंडाणू काढून ते आयव्हीएफ प्रक्रियेसाठी वापरले जात असल्याचे समोर आले आहे.

या सर्व प्रक्रियेत वैद्यकीय निकषांचे पालन झाले का, महिलांचे समुपदेशन व संपूर्ण वैद्यकीय तपासणी झाली का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही पॅथॉलॉजिस्ट आणि स्त्रीरोगतज्ज्ञांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

“अंडाणू संकलन ही अत्यंत संवेदनशील आणि वैद्यकीयदृष्ट्या जोखमीची प्रक्रिया आहे. ती केवळ नोंदणीकृत आणि अधिकृत केंद्रांमध्येच ठरावीक वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्हायला हवी. बेकायदेशीर आणि अनधिकृत केंद्रांमुळे महिलांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो,” असे एका तज्ज्ञाने सांगितले.

वारंवार हार्मोनल इंजेक्शने दिल्यास ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम, रक्तस्त्राव, संसर्ग तसेच भविष्यातील प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असेही तज्ज्ञांनी नमूद केले.

या घटनेमुळे सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (ART) आणि आयव्हीएफ केंद्रांवर कडक नियंत्रण, नोंदणी, नियमित तपासणी आणि पारदर्शक व्यवहार आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात येत आहे. महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT