

रायगड : रायगड जिल्ह्यात ई-केवायसीमुळे अपात्र झालेल्या 63 हजार 780 लाडक्या बहिणींना पात्र होण्याची पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. अर्ज करताना शासकीय किंवा निमशासकीय सेवेत आपले नातेवाईक असल्याचे नमूद केले होते, अशा बहिर्णीना अपात्र होण्यापासून रोखण्यासाठी चुकून अथवा अनावधनाने नमूद केलेली माहिती बदलण्यासाठी राज्य सरकारने 31 मार्चपर्यंत ई-केवायसी सुधारणा करण्याची संधी दिली आहे.
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात नारी शक्ती दूत या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातून पाच लाख 76 हजार 228 प्राप्त झाले होते. यातील 10 हजार 223 अर्ज नामंजूर करण्यात आले होते. दोन्ही योजनांत पात्र ठरलेल्या 63 हजार 780 पेक्षा अधिक लाडक्या बहिणींकडून अर्ज भरताना चुकीचे पर्याय निवडले गेले अथवा अर्ज भरताना तांत्रिक चुका झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या महिलांवर अपात्र ठरण्याची टांगती तलवार होती.
ज्या महिलांना ई-केवायसीमध्ये समस्या निर्माण झाली होती, त्यांनी हेल्पलाइनवर संपर्क साधूनही मदत मिळाली नव्हती, त्यामुळे त्यांना ई-केवायसी करता आली नसल्याची तक्रार जिल्ह्यातील अनेक महिलांनी केली होती.
राज्य सरकारने 6 फेब्रुवारीला निर्गमित केलेल्या एका शासन निर्णयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांची कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ तसेच भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे. यासंदर्भात चुकीचा पर्याय निवडला आहे, अशा व्यक्तींना 31 मार्चपर्यंत ऑनलाइन ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्याची संधी देण्यात आलेली आहे. संबंधित महिलांनी असे केल्यास त्या या योजनेत पुन्हा पात्र ठरू शकणार असल्याने अशा महिलांना पुनश्च ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
तालुका स्तरावरील बँका व ई-सेवा केंद्र यांच्यामध्ये 1 समन्वयाचा अभाव असल्याने ई-केवायसी यशस्वी झाली किंवा नाही याबद्दल महिलांना खात्री पटत नसते. आधार लिंक आणि बँक खाते सक्रिय असतानादेखील केवळ ई-केवायसीच्या चुकीच्या माहितीमुळे सन्मान निधी थांबल्याबाबत महिलांच्या तक्रारी प्रलंबित आहेत. यासंदर्भात स्वतंत्र हेल्पलाइन नंबर 181 हा नेहमीच व्यस्त असल्याची तक्रार जिल्ह्यातील महिलांची आहे.
दरम्यान, महिला व बाल विकास विभागाकडून जानेवारी महिन्याचा हप्ता कधी वितरित केला जाणार याकडे सर्व लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांची रक्कम अदा केली जाते. तर, ज्या लाडक्या बहिणी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेतात त्यांना दरमहा लाडकी बहीण योजनेतून 500 रुपयांची रक्कम दिली जाते.
ज्या महिलांनी यापूर्वी ई-केवायसी केलेली आहे, परंतु चुकीच्या माहितीमुळे त्या अपात्र ठरलेव्या आहेत अशाच महिलांना ई-केवायसी करण्याची पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. ज्या महिलांनी ई-केवायसी केलेलीच नाही त्यांच्यासाठी ही संधी नाही, अशी माहिती रायगड जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी दिली.