अंबरनाथ : अंबरनाथमध्ये शिवसेनेने 32 चा बहुमताचा आकडा मिळवत सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणणाऱ्या शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसला सोबत घेतले. मात्र, भाजपला चेकमेट देत शिंदे सेनेेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी, सत्तेचा मांडलेला सारीपाट उधळून लावत बहुमताचा आकडा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि अपक्षांना सोबत घेत मिळवला. भाजप-शिवसेनेतील या शह-काटशहाची जोरदार चर्चा आहे. Pudhari
ठाणे

Ambarnath Municipal Power: अंबरनाथमध्ये शिंदे गटाचा भाजपला चेकमेट! सत्तेचा सारीपाट उलटवला

राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेनेचा बहुमताचा दावा; भाजप अल्पमतात, जिल्ह्यात राजकीय भूकंप

पुढारी वृत्तसेवा

अंबरनाथ : राजेश जगताप

अंबरनाथमध्ये सर्वात जास्त नगरसेवक निवडून येऊन देखील भाजपाने शिवसेनेसोबत युती न करता त्यांना सत्तेबाहेर लोटण्याचे डावपेच रचले होते. मात्र त्यांचा हा डाव शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उलटवला आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना शह मिळाल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने आता राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या चार नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत आपल्या गटात एकूण 59 नगरसेवकांपैकी 32 नगरसेवकांचे संख्याबळ उभे केले आणि शिंदेसेनेने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणारे पत्र दिले आहे.

काँग्रेसचे 12 नगरसेवक फोडूनही भाजपाकडे आता केवळ 27 नगरसेवक राहिल्याने भाजपा अल्पमतात गेली आहे.

अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने थेट काँग्रेसशी घरोबा केला. ही आघाडी मान्य नसल्याने प्रदेश काँग्रेसने अंबरनाथच्या 12 नगरसेवकांचे निलंबन केले. या सर्व नगरसेवकांना भाजपने आपल्या पक्षात घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी राजकीय खेळी करत भाजपला शह दिला.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा एकमेकांच्या विरोधात लढले होते. या निवडणुकीत भाजपाने बाजी मारत नगराध्यक्ष पद आपल्या पदरात पाडले होते. नगराध्यक्ष पद जिंकणाऱ्या भाजपाला अवघे 14 नगरसेवक निवडून आणता आले. शिवसेनेचे सर्वात जास्त 27 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे सत्तेचा आकडा जुळवण्यासाठी शिवसेना -भाजपा युती होईल असे संकेत असतानाच भाजपाच्या राजकीय खेळीने वेगळे वळण घेतले व शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवत त्यांनी काँग्रेसच्या 12 व राष्ट्रवादी (अजित पवार गट)4 यांना सोबत घेऊन बहुमताचा 31 आकडा गाठला होता. तसे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले देखील.

मात्र भाजपासोबत जाणाऱ्या काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना काँग्रेसने निलंबित केल्यानंतर राजकारण बदलले. निलंबित 12 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला असतानाच शिवसेनेने स्वत:चे 27, राष्ट्रवादीचे 4 आणि 1 अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत बहुमताचा 32 आकडा गाठला. तसे पत्र राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी दिले. शिवसेनेच्या या राजकीय खेळीने अंबरनाथच्या राजकारणात एकच खळबळ माजली. या सगळ्या राजकीय घडामोडीत रवींद्र चव्हाण यांना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी शह दिल्याची चर्चा आहे. येत्या 12 जानेवारी रोजी नगरपालिकेच्या विशेष सभेत सत्तेचे हे नवे समीकरण समोर येणार आहे.

सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे!

एकूण 59 नगरसेवकांपैकी शिवसेनेकडे आता 32 इतका बहुमताचा आकडा असल्याने अंबरनाथ नगरपालिकेच्या सात विषय समित्या आणि उप नगराध्यक्ष पद शिवसेनेकडे आपसूक आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (अप गट) चे गटनेते सदाशिव पाटील यांना उपनगराध्यक्ष पद व एक स्विकृत नगरसेवक पद मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचे काय?

आता भाजपा अल्पमतात गेल्याने काँग्रेसच्या प्रदीप पाटील यांना उपनगराध्यक्ष पद मिळणार नाही. ते भाजपामधून बाहेर पडतात की वेगळा निर्णय घेतात हा विषय गुलदस्त्यात आहे. अल्पमतात गेलेल्या भाजपाने आता काँग्रेसला आपल्या सोबत ठेवण्यासाठी त्यांची मनधरणी सुरू केली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT