

मुंबई: भाजपने हिंदू व मराठीमध्ये गफलत करण्याचा प्रयत्न चालवला आहे तो आधी बंद करावा, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. मुंबई महाराष्ट्रात ठेवून मुंबईची अस्मिता आणि संस्कृती नष्ट करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत व प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या संयुक्त मुलाखतीच्या दुसऱ्या भागात उद्धव म्हणाले, आम्ही मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी एकत्र आलेलो आहोत, म्हणजे इतर भाषकांवर अन्याय करण्यासाठी नव्हे. हिंदुत्वासाठी आलोय याचा अर्थ मुस्लीम किंवा ख्रिश्चनांवर अन्याय करण्यासाठी आलेलो नाही. मुंबईकरांनी मुंबई महापालिका 25 वर्षे आमच्या ताब्यात दिली, त्या मुंबईकरांमध्ये मराठी, मुस्लीम, ख्रिश्चन, गुजराती, उत्तर भारतीयही आहेत. या सगळ्यांना आम्ही समान सुविधा दिल्या आहेत. कोरोनात सर्व धर्मीयांवर आम्ही सारखे उपचार केले आहेत.
मुंबईचा महापौर मराठीच होणार, असा नारा देतानाच भाजप मुंबईचा महापौर हा हिंदू होईल असे म्हणतेय. भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसांवर गोळ्या घालणारा माणूस मोरारजी देसाई हा हिंदू होता की नव्हता? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले. मराठी माणूस जेव्हा रस्त्यावर उतरला होता तेव्हा गुजरातच्या मोरारजींनी पोलिसांना सांगितले की, तुम्हाला माणसे मारण्यासाठी गोळ्या दिल्या आहेत, त्या वाया घालवू नका आणि त्यातूनच 107 हुतात्मे झाले, असे ठाकरे म्हणाले.
मुंबई महाराष्ट्रपासून कोणीही तोडू शकत नाही. पण मुंबईची संस्कृती हळूहळू नष्ट केली जाते हे चिंताजनक आहे. कोणीही येतो आणि या भागाची भाषा गुजराथी आहे हे सांगतो. आमच्यावर हिंदीची सक्ती करणार. म्हणजेच आमची सगळी अस्मिता व संस्कृती मारणार आणि केवळ नावालाच मुंबई महाराष्ट्रात ठेवणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
धारावीत पात्र-अपात्रतेचा खेळ करून अर्धीअधिक मुंबई अदानीच्या घशात टाकल्याचा आरोप त्यांनी केला. मुलुंड, कांजूरमार्ग, दहिसरचे मिठागर, कुर्ला मदर डेअरीची जागा अदानीला देऊन टाकली. आता मुंबईतली ही सगळी झोपडपट्टी तिकडे हलवायची आणि धारावीला मोठे टॉवर बांधायचे, असे त्यांचे नियोजन आहे. मग धारावीच्या बगलेमध्ये अहमदाबादला जाणारे बुलेट ट्रेनचे स्टेशन कसे काय? म्हणजे तिकडे कोण राहणार आहेत?, असे प्रश्न उपस्थित करत झोपडपट्टीमुक्त म्हणजे अदानीयुक्त करीत आहेत. काँग्रेसमुक्त भारत करता करता काँग्रेसयुक्त भाजप झाला आहे, असा टोलाही उद्धव यांनी लगावला.