

नरेश कदम
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्यासोबत येण्याचे केलेले आवाहन डावलून स्वबळावर निवडणूक लढण्याचा मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा हट्ट पक्षाला नडला असल्याचा नाराजीचा सूर काँग्रेसचे नेते काढत आहेत. जागावाटपात 62 जागा घेतल्यानंतरही वंचितने 16 जागी उमेदवार दिले नाहीत आणि स्वबळावर उतरलेल्या काँग्रेसनेही 20 जागा रिकाम्या सोडून दिल्या आहेत.
उद्धव आणि राज ठाकरे बंधूंची युती झाली म्हणून राज विरोधात काँग्रेसने महाविकास आघाडी सोडली. मुंबईत स्वबळाचा नारा दिला. त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला. पक्षश्रेष्ठींनीही तो मान्य केला. मात्र मुंबईच्या महाकाय रणांगणात एकाकी उतरणे कठीण झाल्याने मुंबई काँग्रेसने मग वंचित बहुजन आघाडीसोबत सोयरीक जोडली. वंचितने नेहमीप्रमाणे घासाघीस करून 62 जागा सोडण्यास काँग्र्रेसला भाग पाडले. या जागा मिळेपर्यंत 200 जागा लढवण्याची तयारी असल्याचे वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर सांगत होते. प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली तेव्हा वंचितने केवळ 46 जागांवर उमेदवार उभे केल्याचे स्पष्ट झाले. आज 16 जागांवर वंचितचे उमेदवारच नाहीत. उलट काँग्रेसच्या पाच अधिकृत उमेदवारांच्या विरोधात वंचितने उमेदवार उभे केले आहेत. जागा रिकाम्या सोडून वंचितने काँग्रेसला दगाफटका केला आणि या 16 जागी अपक्षांना पाठिंबा देण्याची वेळ काँग्रेसवर आली, असे तेव्हा म्हटले गेले. मात्र वंचितप्रमाणेच काँग्रेसनेही कार्यकर्त्यांना तिकीट देण्यापेक्षा जागा रिकामी सोडण्याचाच कित्ता गिरवला.
दुसरीकडे कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे म्हणून मुंबई काँग्रेस स्वबळावर लढली. प्रत्यक्षात काँग्रेसनेही 20 प्रभागांत उमेदवारच दिलेले नाहीत. त्यामुळे काँग्रेस आणि वंचित आघाडीने मिळून मुंबईच्या 36 प्रभागांत उमेदवारच दिलेले नाहीत, यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत.
उद्धव ठाकरे गटाशी हातमिळवणी केली तर दोन्ही पक्षांना फायदा होईल, असे काँग्रेस नेत्यांचे मत आहे. पण काँग्रेसमध्ये गटबाजीचे राजकारण सुरू आहे. काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांच्या मुलाला तिकीट मागितले होते. सुरुवातीला तिकीट नाकारले. पण शेवटी दिल्लीपर्यंत दाद मागितल्यावर तिकीट मिळाले. त्यामुळे काही नेत्यांची कोंडी केली जात असल्याचे बोलले जात आहे.