

मुंबई : मुंबईकरांचे प्रश्न समजून घेऊन आमच्या सरकारने रस्ते, मेट्रोसह घरांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. मात्र, मुंबईत जन्मलो सांगणार्यांना 25 वर्षांच्या पालिकेच्या सत्तेत मुंबईकरांसाठी एकही काम करता आले नाही. इथे जन्मलो म्हणणारे जवान होऊन आता म्हातारे व्हायला आले; पण त्यांना मुंबईकरांची एकही समस्या सोडवता आली नाही. त्यामुळे मुंबईकरांसाठी काहीही न करणार्यांना फक्त मुंबईत जन्मले म्हणून हार-फुले घालायची का, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केला.
फडणवीस यांनी मुंबई महानगर क्षेत्रात प्रचार सभांचा धडाका लावला. मुंबईत अंधेरी आणि चेंबूर येथील प्रचार सभांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती आणि महायुती सरकारने मुंबईसाठी केलेल्या कामांची यादी मांडली.
राऊतांनी टोपी लावली
मुंबईच्या पहिल्या प्रचार सभेत बोलताना यांची युती म्हणजे ‘कन्फ्युजन आणि करप्शन’ची युती असल्याची टोपी मी फेकली होती. कोणाचे नाव घेतले नव्हते; पण संजय राऊतांनी बरोबर ती टोपी उचलली आणि राज ठाकरेंना कन्फ्युज, तर उद्धव ठाकरेंना करप्ट म्हटले, असे सांगत दोघांना टोपी लावली, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.