

मुंबई : गौरीशंकर घाळे
होय, माझा जन्म या मुंबईत झाला नाही. पण, मुंबई माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मुंबईच्या विकासाचा ध्यास आम्ही घेतला आणि मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणायचे काम केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर पलटवार केला.
आम्ही मुंबईत जन्मलो नसल्याने आम्हाला इथल्या समस्या माहीत नाही असे ते म्हणतात. पण, मुंबईत जन्मलो म्हणून आम्हालाच कळते म्हणणारे जवान आता म्हातारे व्हायला आले, पण 25 वर्षे सत्ता भोगूनही त्यांना मुंबईकरांसाठी केलेले एकही काम दाखविता येत नाही. मग, अशांना फक्त मुंबईत जन्मले म्हणून हारफुले घालायची का, अशा शब्दांत फडणवीसांनी मुंबईतील प्रचार सभांमध्ये ठाकरे बंधूंना फटकारले.
महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर क्षेत्रात प्रचारसभांचा धडाका लावला असून शुक्रवारी त्यांच्या मुंबईत अंधेरी आणि चेंबूरमध्ये सभा झाल्या. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम, पूनम महाजन, आमदार कालिदास कोळंबकर, मुरजी पटेल, प्रसाद लाड, तमिळ सेल्वन, तुकाराम काते यांच्यासह महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुती सरकारने मुंबईसाठी केलेल्या कामांची यादी वाचून दाखवत ठाकरे बंधूंनी केलेल्या आरोपांचाही समाचार घेतला.
सध्या मुलाखतींचा काळ आहे. मीसुद्धा जाहीरपणे, जनतेत बसून प्रकट मुलाखत दिली. मात्र, काहीजणांनी मुलाखतीसुद्धा घरी बसून घरच्यांनाच दिल्या, असा टोला हाणत मुख्यमंत्री म्हणाले, यांची युती म्हणजे कन्फ्युजन आणि करप्शनची युती असल्याची टोपी मी एका सभेत फेकली होती. कोणाचे नाव घेतले नव्हते. पण, संजय राऊतांनी बरोबर ती टोपी उचलली आणि राज ठाकरेंना कन्फ्युज तर उद्धव ठाकरेंना करप्ट म्हटल्याचे सांगत त्या दोघांना टोपी लावली.
बाळासाहेबांचा जन्म पुण्याचा
मुंबईच्या बाहेर जन्मलो म्हणून भाजप नेत्यांना प्रश्न समस्या माहीत नाहीत, काय विकास केला पाहिजे हे माहीत नसल्याचे ठाकरे बंधू म्हणाले. पण, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा चांगली मुंबई दुसऱ्या कोणाला माहिती होती? मुंबईची सर्वांत चांगली माहिती त्यांना होती. सामान्य मुंबईकरांची नाडी त्यांना चांगली समजत होती, इथला विकास आणि संकल्पना त्यांना माहीत होत्या. पण, अशा बाळासाहेबांचा जन्मही पुण्यात झाला होता, ते मुंबईत जन्मले नव्हते, असे सांगत ठाकरे बंधूंचा यासंदर्भातील दावा मुख्यमंत्र्यांनी फोल ठरविला.
ज्या 106 हुतात्म्यांनी मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी रक्त सांडले त्यापैकी किती जण मुंबईत जन्मलेले होते? त्यात कोकणातले होते, पश्चिम महाराष्ट्रातले होते, मराठवाड्यातले होते, विदर्भातलेही होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे सांगलीत जन्मलेले होते. शाहीर अमर शेख बार्शीत जन्मले. मुंबईवर प्रेम करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही जन्म मुंबईबाहेर झाला, आचार्य अत्रेंचेही तसेच.
मुंबईचे गिरणी कामगार हे सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशा सर्व भागांतून आले होते. मग, हे सगळे मुंबईबाहेरून आले म्हणून यांना मुंबई काय समजते, असा प्रश्न विचारणार का? होय, माझा जन्म या मुंबईत झाला नाही. पण, ही मुंबई माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मुंबईच्या विकासाचा ध्यास आम्ही घेतला आणि मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणायचे काम आम्ही केले.
बाळासाहेबांच्या हिंदुत्वातही घोटाळा
यांनी 25 वर्षांत मुंबई महापालिकेत तीन लाख कोटींचा घोटाळा केला. रस्ते खाल्ले, नाल्यातला कचरा खाल्ला, कोविड काळात खिचडी खाल्ली, डेड बॉडी बॅगचा घोटाळा करत प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाल्ले, पीपीई घोटाळा, ऑक्सिजन प्लांटचा घोटाळा, कोविड सेंटरचा घोटाळा, पत्रा चाळीचा घोटाळा, दलित वस्ती योजनेत घोटाळा, मिठी नदी कचरा वाहतूक घोटाळा, बारमालकांकडून वसुली केली. घोटाळा करता करता हे इतके घोटाळेबाज झाले आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वातही यांनी घोटाळा केला. हिंदुत्वाची साथ सोडून दिली, असा हल्लाबोलही फडणवीस यांनी केला.
मुंबई : चेंबूर येथील प्रचारसभेच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शेजारी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, आ. कॅप्टन तमिल सेल्वन, माजी खासदार पूनम महाजन आदी.