ठाणे; पुढारी वृत्तसेवा
ठाणेमधील खडवली वृद्धाश्रमातील ६७ जणांना कोरोनाची लागण (corona positive) झाल्याची बाब समोर आली असून, त्या सर्वांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. तसेच त्या सर्वांचे लसीकरण ही झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सदर वृद्धाश्रमातील एका कर्मचाऱ्याच्या मुलीला ताप आला होता. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यालाही ताप आला. त्यामुळेच या विषाणूचा इतरांनाही संसर्ग झाल्याची माहिती पुढे येत आहे. यामध्ये एका लहान मुलासह ३९ पुरुष तर एका लहान मुलीसह २८ महिलांचा समावेश आहे. त्या सर्वांना रुग्णालयात आणण्यात येणार असल्याची माहिती कळताच रुग्णालय प्रशासनाची चांगली धावपळ उडाल्याची माहिती सूत्रांनी दिली. (corona positive)
शनिवारी संध्याकाळी ठाणे जिल्हा अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी याबाबतची माहिती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांना दिली. त्यानुसार डॉ. पवार यांनी, रुग्णालय प्रशासनाला कल्पना दिली. सध्या कोरोना रूग्णांची संख्या कमी असल्याने रूग्णालयात कमी कर्मचारी होते. एकाच वेळी ६७ जणांना उपचारासाठी दाखल केले जाणार असल्याची माहिती कळताच रुग्णालय प्रशासनाची चांगली धावपळ उडाली.
हेही वाचलं का?