Solapur: Neera Snan of the Sri Sant Tukaram Maharaj paduka
सोलापूर : श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे नीरा स्‍नान  Pudhari Photo
सोलापूर

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पादुकांना नीरा नदीत स्‍नान

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर ; पुढारी वृत्‍तसेवा

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत सकाळी आठ वाजता आगमन झाले. यावेळी दोन जेसीबींच्या साह्याने पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील तुकोबारायांच्या पादुकांना नीरा नदी पात्रात आज दि.१२ जूलै रोजी सकाळी ७-१० वाजता शाही स्नान घालण्यात आले. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा दि. ११ रोजीचा पुणे जिल्ह्यातील सराटी येथील शेवटचा मुक्काम आटोपला. येथून दि.१२ जुलै रोजी सकाळी ८ वाजता पालखी सोहळयाने सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत अकलूज येथे प्रवेश केला. प्रवेशापूर्वी सोलापूर आणि पुणे जिल्हा यांची सीमा असलेल्या नीरा नदी पात्रात तुकोबारायांच्या पादुकांना निरास्नान घालण्याची परंपरा आहे.

याही वर्षी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी देहू संस्थांच्या वतीने व स्थानिक प्रमुख ग्रामस्थ, मान्यवरांच्या हस्ते नीरा नदी पात्रात पादुकांना शाही स्नान घालण्यात आले. नदीपात्रात पादुकांवर पाणी, दही, दूधाचा अभिषेक, चंदन, हळदीचा अभिषेक करून अष्टगंध, बुक्का लावून आरती झाली. यावेळी हजारो वैष्णवांनी तुकोबारायांचा जयघोष केला व पादुकावर गुलाब पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी सोहळा प्रमुख ह भ प विशाल महाराज मोरे, अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, पुंडलिक महाराज देहूकर प्रमुख उपस्थित होते.

सुप्रभातच्या या रम्य सोहळयाने वैष्णव आनंदला. दुष्काळामुळे मागील काही वर्षात तुकोबारायांचे पादुका स्नान हे टँकर मधील पाण्याच्या साह्याने करण्यात येत होते. परंतु यावर्षी पहिल्यांदाच नीरा नदी परिसरातील पश्चिम भागात झालेल्या पावसामुळे नदीपात्रात पाणी वाहते आहे. या वेळी हजारो वैष्णवांनी नदीपात्रात डुंबण्याचा आनंदही साजरा केला.

वारकऱ्यांनी चाखला अकलूजचा "दालचा भात"

वारी काळात वारकऱ्यांना रोज वेगवेगळ्या पदार्थांचा नाष्टा तसेच जेवण यांची जागोजाग गावकरी सोय करत असतात. संत तुकाराम महाराज पालखी अकलूज मुक्कामी आल्यानंतर सकाळी गांधी चौक शेटे कॉम्पलेक्स येथील हिंदू, मुस्लीम व्यावसायिकांकडून गेल्या आठ दहा वर्षांपासून शाकाहारी चविष्ट दालचा भात नाष्ट्याची सोय करण्यात येते. रोजच्यापेक्षा वेगळ्या चवीचा नाष्टा खाऊन वारकरी पुढे मार्गस्थ होतात.

दत्तराज मित्र मंडळाची खारमुरे शेंगदाणे वाटून सेवा

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात अकलूज गांधी चौकातील दत्तराज मित्र मंडळ दरवर्षी वारकरी बांधवांना खारमुरे वाटप करत असते. चालणार्‍या वारकऱ्यांना उपवास असणाऱ्या वारकऱ्यांना हि सेवा मोठी दिलासा देते. आज (शुक्रवार) या ठिकाणी ११ किलो खारमुरे वाटप करण्यात आले.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा ऐवळे, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आदी मान्यवर उपस्‍थित होते.

जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात गोल रिंगण सोहळ्यावेळी विणेकर्यांनी हरिनामाच्या गजरात हर्षोल्‍हासाने धाव घेतली.

SCROLL FOR NEXT