सोलापूर

सोलापूर : अवैध मद्यासह तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

अनुराधा कोरवी

सोलापूर : पुढारी ऑनलाईन; राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य विक्री व निर्मितीविरोधात सोलापूर जिल्ह्यात एकूण ८ गुन्हे नोंदविले असून पाच आरोपींना अटक केली आहे.  या  कारवाईत सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल विभागाने जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क सोलापूरचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक आदित्य पवार, निरीक्षक मस्करे, दुय्यम निरीक्षक पाटील, झगडे, भांगे यांच्यासह जवान कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. २६ जानेवारी) रोजी मुळेगाव तांडा, बक्षीहिप्परगा तांडा, वडजी तांडा, सीताराम तांडा व सेवालाल तांडा या हातभट्टी ठिकाणांवर कारवाई केली.

यानंतर त्यांना सदर ठिकाणी गुळ मिश्रित रसायनापासून हातभट्टी दारू (अवैध मद्य) तयार होत असल्याचे आढळून आले. पथकाने सदर कारवाईत ६२०० लीटर रसायनाची विल्हेवाट लावली. ८१० लीटर अवैध मद्य व एक मोटरसायकल असा २ लाख १६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. अवैध मद्य निर्मिती व विक्री करणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. एस. कदम (माळशिरस), दुय्यम निरीक्षक वाकडे (अकलूज) व त्यांच्या पथकाने सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथे संतोष शिवाजी मोघे (वय ४३) यास दुचाकी गाडी (क्र. एमएच ४३ एपी ४२४२) वरून अवैध मद्याची वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. एका अन्य गुन्ह्यात आनंदा धर्मा अवघडे (वय ४५) याला दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. माळशिरस येथील दोन्ही कारवाईत पथकाने एकूण १ लाख ११ हजार इतका किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी ठिकाणांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून हॉटेल व धाब्यांचीही वारंवार तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांना अवैध मद्य, बनावट किंवा परराज्यातील मद्य विक्रीबाबत काही माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळविण्याचे आवाहन अधीक्षक नितीन धार्मिक  यांनी केले आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT