गोव्यात तृणमूल काँग्रेसला झटक्यावर झटके | पुढारी

गोव्यात तृणमूल काँग्रेसला झटक्यावर झटके

पणजी: पुढारी वृत्तसेवा; गोव्याची निवडणूक अवघ्या १५-२० दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी पहिल्यांदाच पूर्ण तयारीनिशी तृणमूल काँग्रेस राज्यात निवडणूक लढवणार आहे. सुरुवातीला अत्यंत जोशपूर्णरित्या रिंगणात उतरलेल्या तृणमूल पक्ष सध्या गोंधळात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तृणमूलमध्ये प्रवेश घेतलेले नेते एकामागून एक पक्षातून बाहेर पडत आहेत.

सुरुवातीला पक्षात सामील झालेले लवू मामलेदार यांनी डिसेंबरमध्ये आपला राजीनामा दिला. कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनीही पक्षात सामील झाल्यानंतर २७ दिवसांतच पक्षाला रामराम ठोकला. मंगळवारी काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेले जोसेफ सिक्वेरा यांनीही राजीनामा दिला व भाजपात प्रवेश केला. आज (दि.२६) साळगावचे ॲड. यतीश नाईक यांनीही पक्षावर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडला आहे.

मंगळवारी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस सुनील कवठणकर यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष मतदारांना खोटी आश्वासने देत असल्याने त्यांचे चिन्ह रद्द करावे, अशी मागणी केली आहे.  काँग्रेसचे मडकई मतदारसंघातील उमेदवार जे काही दिवसांपूर्वी तृणमूलचा भाग होते त्यांनीही तृणमूल व आयपॅकची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोग व आयकर खात्याकडे तक्रार दाखल केली आहे. मगो पक्षाच्या खात्यात आयपॅकने १ कोटी रुपये भरले आहेत ते कशासाठी? असा सवाल त्यांनी केला आहे.

ममताच्या या पक्षात राज्यातील विविध भागातील नेत्यांनी प्रवेश केला होता व अवघ्या काही काळातच त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षात कोणत्याच प्रकारचे स्वातंत्र्य नसून सर्व निर्णय पक्षाने नेमलेल्या एजन्सीकडून घेतले जात असल्याचे काहींचे म्हणणे आहे. एकूणच हे असे झटक्यावर झटके पचवून आम्ही निवडणूक जिंकू, हा आत्मविश्वास बाळगणाऱ्या तृणमुलची अवस्था काय असणार आहे हे येणारा काळच ठरवेल.

हेही वाचलंत का? 

Back to top button