सातारा

सातारा :लग्नसराईत विविध डिझाईनच्या पत्रिकांचा थाट

backup backup

सातारा : पुढारी वृत्तसेवा ; दिवाळीनंतर आलेल्या लग्नसराईमुळे पत्रिकेच्या बाजारात ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. हॅन्डमेड, मेटॅलिक, टेक्श्चर, आर्ट या पेपरपासून बनवलेल्या टू फोल्ड, थ्री फोल्ड, लखोटा, फॅन्सी, सिंगल कार्ड, बॉक्सटाईप पत्रिका खरेदी करण्यास शहरी ग्राहकांची पसंती असून पारंपरिक पद्धतीच्या पत्रिका ग्रामीण भागातील ग्राहक खरेदी करत असतात.

लग्नसराईबरोबरच बारसे, वाढदिवस यासाठीही पत्रिका तयार करण्याचा ट्रेंड वाढत आहे. पत्रिका खरेदी करताना नावीन्यपूर्ण डिझाईन आणि फॅ  न्सी पत्रिकांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. ई-मेल, व्हॉट्स अ‍ॅपद्वारे कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याचा ट्रेंड असला तरी प्रत्यक्ष भेटून आमंत्रण देण्याची प्रथा आहे. त्यामुळे पत्रिकांना मागणी असतेच. त्यातच आता लखोटा पद्धतीच्या पत्रिकांना गेल्या काही दिवसांपासून मागणी वाढत आहे.

ग्राहक 300 ते 2 हजारांपर्यंत पत्रिका तयार करून घेतात. त्यासाठी आकर्षक पाकिटांचीही मागणी केली जाते. या पत्रिका टपाल खाते तसेच कुरिअर व्यावसायिकांकडून प्रत्यक्ष लोकांपर्यंत, पाहुणे मंडळी, नातेवाईकांपर्यंत पोहोचवल्या जातात. मराठीबरोबरच अन्य भाषांमधील पत्रिकाही तयार केल्या जातात. 5 रुपयांपासून ते 100-150 रु. प्रती पत्रिका सरासरी दरात उपलब्ध आहेत. हौशी ग्राहक खर्चाचे बंधन ठेवत नाहीत. त्यामुळे 300 ते 500 रुपयांपर्यंतची पत्रिकाही तयार करून घेतली जाते.

वेगवेगळ्या डिझाईनच्या बॉक्सटाईप पत्रिकेला बाजारात मोठी मागणी असून यामध्ये पॅडिंग आणि नॉन पॅडिंग असे दोन प्रकार असतात.
पॅडिंगमध्ये वेगवेगळे कलर, पारंपरिक फीचर्स, विविध प्रकारच्या डिझाईन, पत्रिकेतील मजकुरानुसार बॉक्स पत्रिकेतील इनर ठरवले जाते. दिवाळीनिमित्त मिठाई, ड्रायफ्रूट भेट ठेवण्यासाठी या बॉक्सपत्रिका वापरतात. या पत्रिका गुजराती, राजस्थानी, महाराष्ट्रीयन पॅटर्ननुसार तयार केल्या जातात. ग्राहकांच्या पसंतीनुसार बॉक्सपत्रिका बनवल्या जातात, असेही व्यावसायिकांनी सांगितले.

अलिकडे लग्नपत्रिका विकत घेण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले असले तरी डिझाईन आणि फॅन्सी पत्रिकेसाठी जास्त पैसे खर्च करण्याची ग्राहकांची मानसिकता आहे. देव-देवतांची छायाचित्रे असलेल्या पत्रिकांची मागणी कायम आहे. वधू-वरांचे चित्र असलेल्या पत्रिका ग्रामीण भागातील ग्राहक आवर्जून खरेदी करतात.
– मारुती साळुंखे, पत्रिका व्यावसायिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT