सातारा

सातारा : जिल्ह्यात क्षय रुग्णांची संख्या तीन हजारांवर ; विळखा वाढत असल्याने भीती

मोनिका क्षीरसागर

सातारा : प्रविण शिंगटे
सातारा जिल्ह्यातील सध्याची लोकसंख्या 32 लाखापेक्षा जास्त आहे. त्या तुलनेत क्षयरुग्णांची संख्या चिंताजनक आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत 3 हजार 406 रुग्ण या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. मात्र रुग्णांची ही आकडेवारी केवळ काही खासगी रुग्णालय व सरकारी रुग्णालयातीलच आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयातील रुग्णांची माहिती उपलब्ध झाल्यास हा आकडा आणखी फुगण्याची शक्यता आहे.

क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या रोगजंतुमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. शरीराच्या कोणत्याही अवयवाला क्षयरोग होवू शकतो. या जंतुमुळे फुफ्फुसाला बाधा झाल्यास त्याला फुफ्फुसाचा क्षयरोग म्हणतात. फुफ्फुसाचा क्षयरोग हा सर्वात जास्त आढळणारा क्षयरोग आहे. फुफ्फुसाव्यतिरिक्‍त इतर कोणत्याही हाडे, सांधे, मज्जातंतुलाही क्षयरोग होवू शकतो. क्षयरोगाचे जंतु मुख्यत: हवेतून पसरतात. फुफ्फुसाचा क्षयरोग झालेला रूग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा क्षयरोगाचे हे जंतु हवेत पसरतात. ज्यावेळी जवळचा निरोगी मनुष्य श्‍वास घेतो तेव्हा ते जंतू त्याच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी मनुष्याला क्षयजंतुचा संसर्ग होवू शकतो.

जिल्ह्यात 2021 मध्ये निदान झालेले व बाहेरील जिल्ह्यातून निदान होवून इथे उपचारासाठी आलेले असे 2878 क्षयरोग रुग्ण आहेत. त्यातील 118 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात तालुकास्तरावर 12 क्षयरोग पथके कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रूग्णालय स्तरावर क्षयरूग्णांचे थुंकीचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात.तसेच क्ष किरण तपासणी ग्रामीण, जिल्हा व उपजिल्हा रूग्णालयात तर जिल्हा क्षयरोग केंद्र व बेल एअर हॉस्पिटल पाचगणी येथे सीबीनेट मशिनद्वारे तपासणी केली जात आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात बेडका नमुना घेण्यात येत आहे. तसेच 62 ठिकाणी सुक्ष्मदर्शक केंद्रे आहेत.

सन 2014 मध्ये 2 हजार 820 क्षयरोग रुग्णांची संख्या होती. मात्र सन 2015 मध्ये ही रूग्ण संख्या कमी होवून 2 हजार 606 एवढी झाली. सन 2016 मध्ये या संख्येत क्षयरोग निर्मुलनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने ही संख्या 2 हजार 253 वर आली. मात्र सन 2017 मध्ये रुग्ण संख्येत एक हजाराने वाढ झाली सुमारे 3 हजार 315 रुग्ण आढळले. तर सन 2018 मध्ये पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली त्यामुळे रुग्णांची 4 हजार 275 वर संख्या पोहोचली. मात्र 2019 मध्ये रुग्ण संख्येत घट झाली. ही संख्या 3 हजार 540 वर राहिली. सन 2020 मध्येही रुग्णसंख्या 1 हजाराने घटली असून ती संख्या 2 हजार 454 वर राहिली. सन 2021 मध्ये 2 हजार 866 रूग्ण आढळून आले. तर जानेवारी 2022 ते आजअखेर 542 रुग्ण आढळून आले आहेत.

नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यात आली. यामध्ये सुमारे 4 लाख 46 हजार 637 नवीन क्षयरुग्ण शोधण्यात आले. सुमारे 8 हजार 631 संशयित रुग्णांची थुंकी तपासण्यात आली तर 7 हजार 811 रुग्णांचे एक्सरे काढण्यात आले. त्यामध्ये सुमारे 150 जणांना क्षयरोग झाल्याचे निदर्शनास आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. क्रांती दयाळ यांच्यासह आरोग्य अधिकारी व कर्मचारी क्षयरोगाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सकस आहाराचा 6 हजार रुग्णांना लाभ…

निक्षय पोषण योजनेअंतर्गत क्षयरुग्णांना सकस आहार उपलब्ध होण्याकरता दरमहा 500 रुपयाप्रमाणे 6 हजार 73 रुग्णांना लाभ देण्यात आला आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिक, केमिस्ट, लॅब यांनी त्यांच्याकडील नवीन क्षयरुग्ण शोधून कार्यालयास कळवल्यास 500 रुपये व क्षयरुग्णांचे पूर्ण औषधोपचार केल्यास 500 रुपये दिले जात आहेत. एमडीआर रुग्णांना औषधोपचार पूर्ण केल्यास त्यांना 5 हजार रुपये दिले जात आहेत. तसेच खासगी वैद्यकीय अधिकार्‍यांनी क्षय रुग्णांची माहिती शासकीय रुग्णालयास दिली नसल्यास त्यांच्यावर कारवाई होवू शकते.

जिल्ह्यात आरोग्य विभागासह क्षयरोग कार्यालयामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. जास्तीत जास्त रुग्णांना वेळेत औषधोपचार केले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.
– डॉ. अविनाश पाटील
जिल्हा क्षयरोग अधिकारी, सातारा

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT