सोलापूर : बाजार समिती : दहा हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह | पुढारी

सोलापूर : बाजार समिती : दहा हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतमालावर जवळपास 10 हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. एकीकडे अनेक सहकारी संस्था मोडकळीस येत असताना बाजार समितीसारख्या संस्थेच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळत आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी, अडत दुकानदार, हमाल, तोलार, बाजार समितीच्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतकर्‍यांचा शेतमाल बाजारात येत असल्याने चालतो. बाजारात जितका शेतमाल अधिक येईल तितक्या प्रमाणात आर्थिक उलाढाल अधिक प्रमाणात वाढते.

सोलापूर बाजार समिती ही कर्नाटक राज्याच्या सीमारेषेजवळ आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यातून शेतमाल सोलापूरच्या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात येतो. बाजार समितीचे कार्यक्षेत्र जरी दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यापुरते मर्यादित असले तरी परजिल्ह्यांतून, परराज्यांतून मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक येते. सोलापूर जिल्ह्यात सहकारी दूध संघ, सहकारी बँक, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, सहकारी संस्था अशा अनेक संस्था मोडकळीस येत आहेत. मात्र, सोलापूरच्या बाजार समितीने अर्थकारण वरचेवर वाढीस लावले आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. कांदा या शेतमालातून मोठी आर्थिक उलाढाल होते. कांदा हा सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात येतो. याबरोबर उस्मानाबाद, लातूर, बीड, पुणे, नाशिक आदी परजिल्ह्यांतूनही कांदा अधिक येतो. तुरीची 80 टक्के आवक ही कर्नाटक राज्यातून येते. केवळ 10 टक्के तूर ही स्थानिक शेतकर्‍यांजवळील येते. 10 टक्के तूर इतर जिल्ह्यांतून येते. याबरोबर गहू मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून, तर तांदूळ कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांतून येतो. अशा पध्दतीने विविध शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने अर्थकारणाला चालना मिळत आहे.

मुंबईनंतर सोलापूरची बाजारपेठ ही सर्वाधिक मोठी मानली जाते. शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने आर्थिक उलाढालही दिवसेंदिवस वाढत आहे. बाजार समितीतील अडत दुकानदार असो की व्यापारी, हमाल, तोलार या सर्वांच्या विश्वासार्हतेमुळे बाजारपेठेचा लौकिक वाढत आहे.

गत महिन्यात कांद्याची विक्रमी आवक झाली. शेकडो वाहनांतून आलेला कांदा ठेवण्यासही जागा उपलब्ध नव्हती. अशापरिस्थितीत बाजार समितीने चोख व्यवस्था राबवून आवक झालेल्या कांद्याचा निर्णय घेतला. याचा आर्थिक रूपात समितीला मोठा फायदा झाला. सध्याही राज्यातून व परराज्यातून मोठ्याप्रमाणात आवक होत असून केवळ बाजार समितीतील व्यापारीच नव्हे तर समोरील चहाच्या टपर्‍या, छोटी-मोठी दुकानातील व्यवसायाला बळकटी मिळत आहे. अनेकांना रोजगाराची व उदरनिर्वाहाची सोय करणार्‍या बाजार समितीने स्वच्छता आणि अंतर्गत रस्त्याबाबत तसेच पाण्याच्या व्यवस्थेकडे लक्ष देण्याची मागणी बाजारसमितीतील व्यापार्‍यांकडून होत आहे.

  • अडत दुकानदार – 300
  • खरेदीदार व्यापारी – 200
  • कर्मचारी – 300
  • हमाल, तोलार – 5000
  • छोटे व्यावसायिक – 200
  • माल वाहतूक गाड्या – 1000
  • इतर – 3000
  • एकूण – 10 हजार

कांद्याची मोठी बाजारपेठ

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांद्यासाठी खूपच प्रसिद्ध आहे. नाशिकनंतर सोलापूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक कांद्याची उलाढाल होते. या कांद्याच्या उलाढालीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळत आहे. कांद्याची आवक अधिक आल्यानंतर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा व्यवसाय जोमाने चालतो. परिणामी बाजार समितीच्या उत्पन्नातही मोठी भर पडताना दिसत आहे.

शेतकरी हा मुख्य केंद्रबिंदू आहे. शेतकर्‍यांचा शेतमाल बाजारात आल्यानंतरच येथील बाजारपेठ फुलून दिसते. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलार, कर्मचारी या सर्वांच्या समन्वयामुळे बाजारपेठ सुरू आहे.

– श्रीशैल नरोळे
उपसभापती

 

Back to top button