युद्धाला एक महिना पूर्ण; रशियाकडून हल्‍ले सुरूच! | पुढारी

युद्धाला एक महिना पूर्ण; रशियाकडून हल्‍ले सुरूच!

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) एक महिना पूर्ण झाला असून, युद्धाच्या 28 व्या दिवशी बुधवारीसुद्धा रशियाकडून हल्ले सुरूच होते. चेर्निहिवमधील एक पूल रशियाच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाला.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे वरिष्ठ सल्लागार अंतोली चुबाईस यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी युक्रेनवर हल्ल्याला विरोध केला होता. त्यानंतर त्यांची बदली हवामान खात्यात केली होती. अंतोली 1990 मध्ये बोरिस येल्तसिन यांच्या काळात उपपंतप्रधानही होते.

जपानच्या संसदेला झेलेन्स्कींचे आवाहन (Russia-Ukraine War)

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी जपानच्या संसदेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. रशियावर कडक निर्बंध लावावेत. रशियन मालावरही निर्बंध लावून दबाव वाढवावा, असे आवाहन झेलेन्स्की यांनी केले. गुरुवारी (दि.24) होणार्‍या ‘नाटो समिट’मध्येही ते आभासी पद्धतीने सहभागी होणार आहेत. या बैठकीत ते युक्रेनची हवाई हद्द बंद करण्याची मागणी करू शकतात.

…तरच अण्वस्त्रांचा वापर करू : रशिया (Russia-Ukraine War)

रशियाने ज्या हेतूने युद्ध सुरू केले त्यात त्यांना अपयश आले आहे. या अपयशानंतरही हे युद्ध सहज संपणार नाही, अशी टीका अमेरिकेने केली आहे. त्यावर पलटवार करताना क्रेमलिनचे प्रवक्‍ता दमित्री पेसकोव्ह यांनी, युक्रेनमध्ये जे काही सुरू आहे ते आमच्या प्लॅननुसारच सुरू असल्याचे स्पष्ट केले. तसेच रशिया अण्वस्त्रांचा वापर तेव्हाच करेल जेव्हा रशियाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. युद्धाच्या 28 व्या दिवशीही रशियाकडून हल्ले सुरूच होते.

आज ‘नाटो समिट’; बायडेन उपस्थित राहणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन गुरुवारी (दि.24) होणार्‍या आपत्कालीन ‘नाटो समिट’साठी उपस्थित राहणार आहेत. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे ही बैठक होत आहे. त्यानंतर जी-7 गटातील राष्ट्रांच्या नेत्यांनाही बायडेन संबोधित करणार आहेत. याशिवाय बायडेन युरोपीय संघाच्या नेत्यांशी चर्चा करणार असून, युक्रेन आणि रशियाचा शेजारी देश असलेल्या पोलंडचाही दौरा करणार आहेत.

ताज्या घडामोडी

* हेरगिरीच्या संंशयावरून पोलंडने 45 रशियन अधिकार्‍यांची हकालपट्टी केली. त्यांना देश सोडण्यास सांगितले आहे.
* जर्मन चान्सलर ओलाफ स्कॉल्झ यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना युद्धात जैविक आणि रासायनिक अस्त्रांचा वापर करू नये, असे सांगितले.
* पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मुस्लिम देशांना तसेच चीनला युक्रेनला मदत करण्याचे आवाहन केले.
* अमेरिका आणि इतर राष्ट्रे रशियाला जी-20 गटातून बाहेर काढण्याची शक्यता
* युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की गुरुवारी स्वीडनच्या संसदेला आभासी पद्धतीने संबोधित करणार
* अमेरिका युक्रेनला रशियन बनावटीची शस्त्रास्त्रे पुरवत असल्याचा ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’चा दावा
* कीव्हमध्ये हवाई हल्ल्यात एक औद्योगिक इमारत उद्ध्वस्त.

Back to top button