सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातार्यात महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत सुरु असताना व कुस्ती निकाली लागल्यानंतर जल्लोष सुरु असताना झालेल्या गर्दीत चोरट्यांनीही हात धुवून घेतला. सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचा साडेसहा तोळे वजनाच्या सोन्याच्या चैनी जबरदस्तीने चोरल्या. या घटनांमुळे कुस्तीपट्टूंमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. एवढा मोठा पोलिस बंदोबस्त असताना चोरट्यांनी चोर्या केल्याने प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांनी तातडीने या विषयात लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे.
शंभूराज शिवाजी भोसले (वय 25, रा. राधिका रोड) व स्वप्नील शंकर घोडके (वय 28, रा. विजयनगर, कराड) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी सायंकाळी महाराष्ट्र केसरीची अंतिम सुरू कुस्ती होती. यामुळे सातारा जिल्ह्यासह तमाम महाराष्ट्रातून कुस्तीप्रेमी सातार्यातील शाहू स्टेडियममध्ये दाखल झाले होते. दुपारपासूनच रखरखत्या उन्हात देखील कुस्ती प्रेमींनी उत्साहात हजेरी लावली होती. सांयकाळी प्रत्यक्षात कुस्तीला सुरुवात झाल्यानंतर स्टेडियम सर्व बाजूने तुडुंब भरले होते. अंतिम कुस्तीचा निकाल लागल्यानंतर कुस्तीपट्टूंनी जल्लोष केला.
कुस्ती सुरु असताना व निकाल लागल्यानंतर झालेल्या गर्दीचा चोरट्यांनी पुरेपूर गैरफायदा घेतला. प्रेक्षक म्हणून आलेल्या व गळ्यात सोन्याच्या चैनी असणार्यांना चोरट्यांनी टार्गेट केले. तक्रारदार शंभूराज भोसले यांच्या गळ्यातून 1 लाख रुपये किंमतीची अडीच तोळे वजनाची तर स्वप्नील घोडके यांच्या गळ्यातून 1 लाख 60 हजार रुपये किंमतीची 4 तोळे वजनाची जाड पिळाची चैन चोरुन नेली. गळ्यातील सोन्याची चैन गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली. मात्र त्यांना ऐवज सापडला नाही.पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर दोघांच्या चैनी गेल्याचे समोर आले. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेला तगडा पोलिस बंदोबस्त असताना चोरटे गर्दीत घुसतातच कसे? त्यांची हिंमत होतेच कशी? पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. तक्रार दाखल झालेल्या दोनच चोर्या असल्या तरी आणखीही अनेकांच्या बाबतीत असाच प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
सातार्यात महाराष्ट्र केसरीची स्पर्धा भरवली जात असताना तेथे सीसीटीव्ही नसल्याचे समोर येत आहे. दुसरीकडे ड्रोन कॅमेरांचा वापर झालेला आहे. यामुळे आता या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांचा कस लागणार आहे. ड्रोन कॅमेर्यात चोरटे कैद झाले आहेत का? याचा शोध पोलिस घेत आहेत.
तक्रारदारांच्यावतीने संपादक शिवाजी भोसले यांनी पोलिसांना व्हिडिओ फुटेज व संशयित आरोपीचा चेहराही पाठवला आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास केला तर चोरटे तातडीने सापडू शकतील. मात्र, शाहुपूरी पोलिसांनी ती मानसिकता दाखवायला हवी. जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी या प्रकाराची तातडीने दखल घ्यायला हवी, अशी मागणी अनेकांनी केली आहे.